नागरिकांची गैरसोय; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी…
कणकवली, ता.१४: लॉकडाऊन कालावधीत बंद झालेली कणकवली शहरातील आधारकार्ड सेवा केंद्रे अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शासकीय सेवा, दाखले, बँका आदींसाठी आधारकार्ड देता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आधार केंद्रे सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी तालुकावासीयांतून होत आहे.
कणकवली शहरात यापूर्वी पोस्ट ऑफिस, विदर्भ कोकण बँक तसेच काही शासकीय सेवा केंद्रांमध्ये आधारकार्ड अपडेटची सुविधा उपलब्ध होती. मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोना प्रादुर्भावात ही सर्व आधार सेवा केंद्रे बंद करण्यात आली. त्यानंतर ती अद्यापही सुरू झाली नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व शासकीय कार्यालये, बॅका, एस.टी.सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. यात ग्राहकांना बँक, शासकीय सेवा, विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड अत्यावश्यक झाले आहे. तसेच अनेक नागरिकांना आधारकार्डवर मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे. तर काहींना दुसरा मोबाईल क्रमांक जोडायचा आहे. ही सेवा फक्त आधार सेवा केंद्रामध्येच केली जाते.