हिंदू-ख्रिस्ती बांधवांकडून साकडे ; उद्याचा वर्धापनदिन साध्या पद्धतीने साजरा होणार…
मालवण, ता. १४ : शहरातील गवंडीवाडा येथील श्री गणेश-येशू मंदिराच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना विषाणू महामारीचे संकट दूर व्हावे या भावनेने होमहवन व लघुरुद्र करण्यात आले. कोरोना विषाणूचा लवकरात लवकर नायनाट होवो व या संकटातून संपूर्ण जगाची मुक्तता होवो, असे साकडे श्री गणेश व येशूच्या चरणी उपस्थित हिंदू- ख्रिश्चन बांधवांनी घातले.
शहरातील गवंडीवाडा भागात हिंदू व ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येत स्थापना केलेले श्री गणेश-येशू मंदिर आहे. एकाच देवालयात श्री गणेशाची व येशू ख्रिस्ताची प्रतिमा असणाऱ्या हिंदू- ख्रिश्चन बांधवांच्या एकीचे प्रतीक असणाऱ्या या अनोख्या मंदिराचा १७ वा वर्धापन दिन उद्या १५ ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. दरवर्षी या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र यावर्षी कोरोना महामारी संकटामुळे थाटामाटात वर्धापन दिन साजरा न करता साध्या पद्धतीने छोटेखानी स्वरूपात वर्धापन दिन साजरा करण्याचे गणेश-येशू मंदिर मित्रमंडळाने ठरविले. त्यानुसार आज कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पुरोहितांच्या साथीने होमहवन व लघुरुद्र करण्यात आले. या विधींनंतर कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे असे साकडे मित्रमंडळाच्या सदस्यांनी ईश्वराकडे घातले.
या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या १५ रोजी छोटेखानी स्वरूपात सत्यनारायण पूजा व येशू पूजा होणार आहे, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे, सॅनिटायझर वापर व सोशल डिस्टनसिंग या नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती मित्रमंडळाचे अध्यक्ष अंतोन उर्फ आतु फर्नांडिस यांनी दिली. यावेळी आतु फर्नांडिस यांच्यासह उपाध्यक्ष बबन वाघ, कार्याध्यक्ष दीपक कदम व इतर सदस्य उपस्थित होते.