पालिका कार्यालयातच कळशी घेऊन ठिय्या; प्रशासना विरोधात केली नाराजी व्यक्त…
सावंतवाडी ता.१५: आपल्या घरात नगरपालिकेचे पाणी येत नसल्याने शहरातील ज्येष्ठ सत्ताधारी नगरसेवक राजू बेग यांनी आज येथील पालिका कार्यालयात सकाळीच कळशी घेऊन ठिय्या मांडला.आपल्याला दोन दिवस पाणी नाही.त्यामुळे आम्ही करायचे काय?,असा प्रश्न करत त्यांनी गाण्याच्या माध्यमातून आपली व्यथा प्रशासनाकडे मांडली.हे अनोखे आंदोलन सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकाकडून होत असल्यामुळे पालिका कार्यालयात बघ्यांची गर्दी जमली होती.तर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की,सावंतवाडीचे तब्बल सात वेळा निवडून आलेले नगरसेवक आज अचानक येथील पालिका कार्यालयाच्या समोरच्या प्रांगणात कळशी घेवूनच वाजवत उपोषणाला बसले.आपल्याला गेले दोन ते तीन दिवस घरात पाणी येत नाही.त्यामुळे सकाळच्या विधी उरकायच्या कशा,असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला.घरातील व्यक्ती त्रस्त आहेत. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कल्पना देऊन सुद्धा कोणी दखल घेतली नाही.फोन उचलत नाही.त्यामुळे करावे काय ,मी कोणाकडे न्याय मागू, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.दरम्यान अधिकारी आसावरी शिरोडकर यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्या भागातील वॉल खराब झाल्यामुळे हा प्रकार घडला,असे त्यांनी सांगितले.मात्र तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,असे ते म्हणाले परंतु आम्हाला आश्वासन नको,कृती हवी काही झाले तरी आपण माघार घेणार नाही,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान श्री.बेग यांच्या घरी व ज्यांना पाणी मिळाले नाही त्यांच्या घरी बंब पाठविल्या नंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.