पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.१५: तालुक्यात सलग दोन दिवस परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. बुधवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने बहुतांशी शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले भात पीकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बहरलेले पीक भिजल्याने शेतकऱ्यांसमोर आता नुकसानीचे संकट उभे राहिले आहे.
अॉक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस अजून गेलेला नाही. परतीचा पाऊस अजूनही पडत असल्याने पाऊस कधी जाणार या विवंचनेत बळीराजा आहे. चांगला पाऊस पडल्याने भात पीकही बहरून आले. मात्र सततच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे.
जिल्ह्यात काही भागात कापणी सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे भात पीक चांगले येवूनही शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी चार महिने केलेली शेतीची मेहनत चांगली फळाला आली होती. मात्र सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.