जनजीवन विस्कळीत : महामार्ग खड्डेमय, भात शेतीचेही प्रचंड नुकसान
कणकवली, ता.१५ : कणकवली तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भात शेतीमध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर काँक्रिटीकरण न झालेला मुंबई-गोवा महामार्ग ठिकाणी खड्डेमय झाला आहे.
सलग तीन दिवसाच्या पावसाने नदी नाले ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. तर पक्व झालेल्या भात शेतीमध्ये पाणी जात असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. कणकवली शहर आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची रिपरिप कायम राहिली असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. बाजारपेठेत ग्राहकांची तुरळक उपस्थिती आहे. सततच्या पावसाने मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दैना झालेली आहे. ज्या भागात डांबर आणि सिमेंट काँक्रीटचा रस्ता झालेला नाही तेथे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत याखेरीज जिल्ह्यातील प्रमुख मार्ग आणि ग्रामीण मार्गांची ही मोठी दुरवस्था झाली आहे.