मराठा मंडळ बंधारा येथील घटना; पोहता येत असल्याने युवक बचावला…
कणकवली, ता. १५ : शहरातील गडनदीवर असलेल्या मराठा मंडळ कडील केटी बंधार्यावरून दुचाकीसह युवक नदीत कोसळला पण सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून हा युवक बचावला. पण दुचाकी नदीत वाहून गेली. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर दुचाकीचा शोध घेण्यासाठी काहींनी नदीपात्रात शोध मोहीम राबविण्याचा प्रयत्न केला. पण सततच्या पावसामुळे नदी पात्र दुथडी भरून वाहत असल्याने शोध मोहिमेला अडथळा येत होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वागदे येथील समीर परब हा युवक आपल्या मित्राच्या एक्टिवा दुचाकीवर मागे सिलेंडर बांधून घराच्या दिशेने जात होता. मराठा मंडळ येथील केटी बंधार्यावरून जात असताना अचानक दुचाकीच्या मागे बांधलेल्या सिलेंडरची दोरी सुटली अन समीर दुचाकी सह केटी बंधार्यावरून नदीपात्रात कोसळला. पण अशा स्थितीतही प्रसंगावधान राखत समीर हा पोहत नदीपात्रात बाहेर आला. नदीच्या पाण्याला वेग असल्याने दुचाकीवरील सिलेंडर पाण्याच्या वळशातून पात्राच्या कडेला आला. पण दुचाकी मात्र प्रवाही पाण्याने वाहून गेली. उंचावरून नदीत पडल्याने केटी बंधाऱ्याच्या पिलरला आपटून समीरच्या पायाला दुखापत झाली होती. घटनेनंतर अनेकांनी केटी बंधाऱ्यावर गर्दी केली होती. दुपारी उशिरापर्यंत दुचाकीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता.