नीतेश राणे ; कणकवलीत डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, रुग्णवाहिका चालकांचा सत्कार…
कणकवली, ता.१५ : राज्य सरकारचे कोणतेही पाठबळ नसताना देखील कोरोनाचे आव्हान कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने यशस्वीपणे पेलले आहे. यात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, रुग्णवाहिका चालकांचे मोठे योगदान आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता समाजासाठी योगदान देणारे हे खरे कोरोना योद्धे आहेत. त्यांचे कौतुक व्हायलाच हवे असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.
येथील नगरपंचायत सभागृहात आज कोरोना काळात दर्जेदार आरोग्य सुविधा देणार्या डॉक्टर, व आरोग्य सेवक आणि १०८ रूग्णवाहिकेवरील वाहन चालकांचा सत्कार आमदार नीतेश राणे यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, मुख्याधिकारी विनोद डवले, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्यासह नगरसेवक अभि मुसळे, कविता राणे , बंडू हर्णे, शिशिर परुळेकर,सौ.प्रतीक्षा सावंत,महेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले, कोरोनाच्या भीतीने राज्याचे मुख्यमंत्री घाबरून घराच्या बाहेर येत नाहीत. मात्र कणकवलीतील कोरोना योद्धांनी आयुष्याची पर्वा न करता एकसंधपणे आरोग्य बजावली. त्यामुळे कणकवली तालुक्यात वेगाने फैलावणारा कोरोना नियंत्रणात आला. एवढेच नव्हे तर कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे.
कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला सर्वात जास्त त्रास सरकारी यंत्रणेने दिला. जिल्हा प्रशासनाने कसलीच ताकद दिली नाही.जर सरकार नावाची चीज असती तर आज खूप सोयी सुविधा मिळाल्या असत्या. जिल्हा नियोजन मधील २३ कोटी आज कोरोनावर खर्च करण्यासाठी ठेवले आहेत.ते शोकेश मध्ये ठेवलात काय ? ते म्युझियम ठेवले आहेत त्यांना हात लावला तर झटका लागतो.असा हा निधी जर आरोग्य कर्मचार्यांच्या वेतन, बोनस साठी वापरला असता तर यंत्रणेत आणखीनच आत्मविश्वास वाढला असता. केवळ यातील ८ कोटी खर्च झाले. प्लाझ्मा थेरपीची मागणी मी सातत्याने केली. दोन वेळा जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला.मात्र या प्लाझ्मा थेरपीचा उद्घाटन रत्नागिरीत होत आहे.म्हणजे मागणी आमची आणि फायदे त्यांना. ही सापत्नपणाची वागणूक सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिली जात आहे अशी टीका श्री.राणे यांनी केली.
आजच्या या कार्यक्रमात फक्त शाल टाकणार नाही तर तुमचे ऋण कायम ठेवेन, लोकप्रतिनिधी म्हणून तुमची सेवा करेन. तुमच्या कुटुंबाला ताकद देईन, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला. तसेच स्वत:च्या खिशात हात घालून रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर आज आपल्याकडे आहेत. पण डॉक्टरांचे खच्चीकरण करण्याचे काम सरकार करतेय असे श्री.राणे म्हणाले,.
नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, गेल्या ८ महिन्यात हे चालक व आरोग्य कर्मचार्यांना मी जनतेसाठी झटताना पाहिले. त्यांच्या न्याय हक्का साठी आम्ही प्रयत्न करू. तुमच्या कार्याचा गौरव या निमिताने होत आहे. यावेळी २८ चालक व ३१ आरोग्य अधिकारी, कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण विभागातील उपक्रमशील कर्मचारी सचिन तांबे यांनी मुडेशवर मेदानाकडे राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमे बद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन तांबे यांनी केले.