काही काळ वाहतूक ठप्प; दुपारनंतर वाहतूक पूर्ववत…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.१५: तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार कोसळणा-या पावसामुळे भुईबावडा घाटात दरडीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान सार्वजनिक बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी दरड बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली.
तालुक्यात बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी पावसाचा जोर वाढल्याने सकाळी भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून सुमारे ५ ते ६ कि. मी. अंतरावर दरडीचा काही भाग कोसळला आहे. शिवाय ठिकठिकाणी छोटे मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. दरम्यान सार्वजनिक बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी कोसळलेली दरड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे.