दिपक केसरकर; मंजूर झालेले मेडीकल कॉलेज जिल्हावासीयांसाठी भूषण ठरेल…
सावंतवाडी ता.१५: आंबोली आणि गेळे ही दोन्ही गावे आदर्श गावे म्हणून घोषीत करण्याबरोबरच आंबोलीची बाजारपेठ फॉरेस्ट मधून वगळण्याची मागणी आपण आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली आहे,अशी माहीती आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली.दरम्यान सिंधुदूर्ग जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेले मेडीकल कॉलेज हे जिल्हावासीयांसाठी भूषणावह आहे.त्याचा फायदा रुग्णांसोबत नव्याने तयार होणार्या जिल्ह्यातील युवकांना होणार आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आपण आभार मानतो,असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मेडीकल कॉलेजला मंजूरी मिळाल्यानंतर श्री.केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले गेली अनेक वर्षे जिह्ह्यात मेडीकल कॉलेज व्हावे,अशी मागणी होती.तत्कालीन मंत्री भाईसाहेब सावंत यांनी ही ती मागणी उचलून धरली होती.त्या मागणीला आज प्रत्यक्ष स्वरुप आले आहे.याचा आपल्याला आनंद आहे .होणारे कॉलेज हे ओरोस येथील सिव्हील हॉस्पिटलच्या जागेत व्हावे,अशी आमची इच्छा आहे.
ते पुढे म्हणाले, आजच्या बैठकीत आपण सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या व मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मागण्या केल्या आहेत. यात नद्यातील गाळ काढण्याची मागणी आहे. तो निर्णय झाल्यास नद्या खोल होण्याबरोबर वाळूची समस्या मार्गी लागणार आहे.खारलॅण्डचे खराब झालेले बंधार्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे .त्यामुळे शेतीची नुकसानी होत आहे. त्यामुळे हे बंधारे बांधण्यात यावेत,अशी आपण मागणी केली आहे,असे त्यांनी सांगितले.