अन्यथा आत्मदहन करू ; देवली, आंबेरी, चिपी ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…
मालवण, ता. १५ : देवली वाघवणे, आंबेरी वाकवाडी येथील खाडीपात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपशाला आळा घालावा अशा मागणीचे निवेदन देवली, आंबेरी, चिपी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान सातत्याने लक्ष वेधूनही प्रशासनाकडून धडक कारवाई न झाल्यास प्राणांतिक उपोषण करू त्यानंतरही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामस्थ, शेतकऱ्यांची घरे, शेतजमीन, माडबागायतीला लागूनच कर्ली खाडी आहे. आंबेरी वाकवाडी नदीपात्राच्या समोर चिपी जुवा बेट आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होऊ पाहणारे हे बेट अवैध वाळू उपशामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत कर्ली खाडीत देवली वाघवणे, आंबेरी वाकवाडी, चिपी जुवा बेट येथे वाळूची अक्षरशः लूट चालली आहे. शिवाय नजीक कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कर्ली पुलापासून अवघ्या ५० फुटावर अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. त्यामुळे या पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वाळू उपशामुळे खारबंधाराही खचला आहे. गावातील काही स्वयंघोषित पुढारी, भ्रष्ट महसूल अधिकारी, पोलिस खात्यातील काही भ्रष्ट कर्मचारी यांचे वाळू माफियांशी आर्थिक संबंध असल्यानेच अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सद्यस्थितीत वाळू उपशाला बंदी असतानाही कर्ली खाडीत वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या होड्या नदीपात्रात उभ्या असून याकडे मेरिटाईम बोर्डाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. बेसुमार वाळू उपशामुळे या तिन्ही गावातील शेती, घरे, माडबागायती धोक्यात आली असून आमची पुढील पिढी वाचविण्यासाठी कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर किशोर वाक्कर, सदानंद गोरे, विरेश मांजरेकर, दीपक चव्हाण, प्रकाश चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.