वाहतूक तीन तास ठप्प; अनेक कॉजवे पाण्याखाली; तर नावळे येथे पुराचौया पाण्यात गाय गेली वाहून
वैभववाडी/पंकज मोरे
तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजविला आहे. गुरुवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढल्याने वैभववाडी उंबर्डे मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने यामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प होती. सायंकाळी उशिरा वाहतूक सुरळीत झाली. तर या पावसामुळे पाच घरांची पडझड होवून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासात तालुक्यात १२४ मी. मी, इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसाने हेत येथील चंद्रकांत बाबुराव फोंडके यांच्या घराची पडवी कोसळून नुकसान झाले आहे.तर प्रकाश राजाराम फोंडके व शांताराम धकटू फोंडके यांच्या पडवीचे छत कोसळले आहे.कुसूर बौध्दवाडी येथील श्रीपत सखाराम कांबळे यांच्या घराची पडवी कोसळून १० हजार रु.नुकसान झाले आहे.मोहन पांडुरंग चौधरी यांचे घराचे २०.हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.या पावसाने कापणीला आलेली भात शेतीत काही ठिकाणी पाणी घुसल्यामुळे आडवी होऊन जमिनदोस्त झाली आहे.
तर अनेक ठिकाणी कापलेली भात शेती व वैरण भिजून कुजून जात आहे.हातातोंडाशी आलेली शेतीची डोळ्या देखत नासधूस होत असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.पावसामुळे पुन्हा नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत.त्यामुळे तालुक्यात पुल सदृश्य परिस्थिती आहे. दुपारी पावसाचा जोर काहीसा ओसरला असे वाटत असताना सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला आहे.तालुक्यातील जनजीवन या पावसाने विस्कळीत झाले आहे. तर नावळे येथील शेतकरी अंकुश रामचंद्र घाडी यांची गाय पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
फोटो- वैभववाडी उंबर्डे मार्गावर सोनाळी येथे काॕजवेवर आलेले पाणी.