बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत; आता आमचा वाली कोण?, शेतकऱ्यांचा सवाल…
बांदा,ता.१६:
बांदा, मडुरा दशक्रोशीत परतीच्या पावसाच्या अस्मानी संकटाने कर्ज घेऊन केलेली भातशेती पूर्णपणे वाहून गेल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता जगायचे कसे याची चिंता सतावत आहे. घाम गाळून व पदरमोड करून उभे केलेले पीक निसर्गाच्या बेभरवशी लहरीपणामुळे पुरते नेस्तनाबूत झाल्याने बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर हे दुहेरी संकट आल्याने आपली व्यथा मांडावी तरी कोणाकडे? बळीराजाला वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील सहा दिवसांपासून मडुरा, बांदा दशक्रोशीत सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पंचनामे करण्याचे आदेश देऊनही गुरूवारी दुपारपर्यंत कोणताही अधिकारी पंचनामा करण्यासाठी बांधावर आला नसल्याने बळीराजाला वाली कोण असा सवाल नुकसानग्रस्तांमधून केला जात आहे. बँक, सोसायट्यांमधून कर्ज घेऊन केलेली शेती पूर्णपणे पाण्यात गेल्याने कर्ज कसे फेडणार अशा विवंचनेत शेतकरी अडकला आहे.
कोकणात ९० टक्के शेतकरी भातशेती करतात. भातशेती हे प्रमुख पीक आहे. शेतकरी वर्षभराची जोड भातशेतीतून करत असतो. मात्र दरवर्षी अवकाळी पावसाचा व निसर्गाच्या असमतोलपणाचा फटका शेतीला बसतो. यावर्षी तर पावसाने कहरच केला आहे. सुरुवातीला भातशेतीसाठी पोषक असलेल्या पावसाने आतातर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. अजूनही पाऊस थांबायची चिन्हे नसल्याने कापणीयोग्य तयार झालेले भात शेतातच कुजले आहे. तर पावसाने आडव्या झालेल्या भाताच्या लोंब्याना पुन्हा कोंब फुटल्याने संपूर्ण भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या भातशेतीची नुकसानभरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शासन नेहमीच कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा नाराजीचा सूर आहे