कुडाळ राज्य उत्पादन शुल्कची कारवाई;दहा लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त…
बांदा,ता.१६:
गोव्यातून पुण्याच्या दिशेने होणार्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीवर कुडाळ उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत १ लाख ४६ हजार ८८० रुपयांच्या दारुसह एकूण १० लाख २१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी ऋषीकांत भगवान अवसरमल (३१, रा. पुणे) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली.
गोव्यातून महाराष्ट्रात दारु वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती कुडाळ उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मुंबई – गोवा महामार्गावर बांदा चौक येथे सापळा रचण्यात आला होता. गोव्यातून पुणेच्या दिशेने येणारी कार (एमएच १२ ईएस ८२९४) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये विविध ब्रँडचे २० बॉक्स आढळून आले. बाजारभावाप्रमाणे याची किंमत १,४६,८८० रुपये आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ८ लाख ७५ हजार रुपयांची अर्टिका कार असा एकूण १०,२१,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पथकाचे निरीक्षक एन. पी. रोटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सी. एल. कदम, जवान एच. आर. वस्त यांच्या पथकाने केली. अधिक तपास प्रभारी निरीक्षक एन. पी. रोटे करीत आहेत.