महामार्गालगत उभ्या टेम्पो ट्रॅव्हलर्सला आग

2

नगरपंचायतच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात

कणकवली, ता.१४ : मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली येथे उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर्स ला आग लागून ट्रॅव्हलर चे मोठे नुकसान झाले आहे. टेम्पो ट्रॅव्हलरच्या समोरील भागातून दुपारी धूर येऊ लागल्याने ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत टेम्पो ट्रॅव्हलरच्या केबिन मध्ये आगीने पेट घेतला होता. त्यानंतर तातडीने कणकवली नगरपंचायत अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत टेम्पो ट्रॅव्हलर चा समोरील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना महामार्गावर साकेडी फाट्याजवळ आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर जानवली येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत आणि ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य केले. उपलब्ध माहितीनुसार टेम्पो ट्रॅव्हलर्स तेथील गॅरेजमध्ये काम करण्यासाठी उभी करून ठेवण्यात आली होती असे सांगण्यात आले. वरवडे येथील एका युवकाची ही गाडी असल्याचे समजते. नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी या गाडीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.मात्र गाडीच्या आतील भाग जळून पूर्णता बेचिराख झाला. भर दुपारी लागलेल्या आगीमुळे भडकलेल्या आगीच्या ज्वाळांनी आग आटोक्यात आणण्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

7

4