सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १५० कोटीचे नुकसान भरपाई पॅकेज हवे…

2

संदेश पारकर ; जिल्‍ह्‍यातील नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर…

कणकवली, ता.२६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्‍ते वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यातील सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी १५० कोटींचे पॅकेज दिले जावे अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे. तसेच त्‍यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्‍या नुकसानीचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.
श्री.पारकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले की, तौक्‍ते वादळामुळे फळ बागायतदार, शेतकरी तसेच मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजू, नारळ, पोफळी, कोकम तसेच केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे पंचनाम्यानुसार भरपाई देऊन नाही तर एकेक झाड वर्षानुवर्षांचा उत्पन्नाचा आधार असते, याचा विचार करुन भरपाई मिळणे आवश्‍यक आहे. तौक्‍ते वादळात किनारपट्टीसह सह्याद्री पट्ट्यातील अनेक घरांना, गोठ्यांना, इमारतींना, शासकीय कार्यालयांना वादळाचा मोठा फटका बसला असून काही घरांची व गोठ्यांची छपरे उडुन गेली आहेत. याचा देखील गांभीर्यपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. अंशतः नुकसान झालेल्या घरांचा दुरुस्ती खर्च मात्र मोठा आहे. त्यामुळे पूर्णतः नुकसान धरूनच भरपाई निधी मिळावा. तसेच काही मच्छिमारांच्या नौका बुडाल्या आहेत, तर अनेक जाळी वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच उभ्या असलेल्या नौका मोठ्या वार्‍यामुळे कलंडल्या आहेत तर काही नौका खडकांवर जाऊन आदळल्या आहेत. छोट्या नौका तर अक्षरशः: वाहून गेल्या आहेत. यात काही खलाशांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना आणि मृत्यूमुखी पडलेल्या मच्छिमारांच्या कुटुंबियांना देखील तातडीने जास्तीत जास्त भरपाई मिळावी.अनेक मच्छिमारांनी सोसायट्यांकडून कर्जे घेतलेली असून ते माफ करण्यासोबतच सोसायट्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी पारकर यांनी केली आहे.
पुढील काळातही वादळांची शक्‍यता आहे. त्‍यामुळे नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी वीज वाहिन्या अंडरग्राऊंड केल्‍या जाव्यात, किनारपट्टीवरील अजस्र लाटा थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात धुप प्रतिबंधात्मक बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात यावे. देवगड, मालवण, वेंगुर्ले या किनारपट्टीवरील तालुक्‍यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी प्रत्येकी एक रेस्क्यू टीम तसेच जिल्ह्यासाठी एक एनडीआरएफचे पथक कायमस्वरूपी देण्यात येणे गरजेचे आहे, अशीही मागणी संदेश पारकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

0

4