फडणवीसांना धमकावणं शक्‍य नसल्‍याने नीलेश राणेंचा जळफळाट…

2

वैभव नाईक ; पालकमंत्री विरोधी पक्षनेत्‍यांच्या भेटीत वावगं काय…?

कणकवली, ता.२६ : पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत काम करताना गेल्या वर्षभरात अनेक विरोधी सदस्य त्यांच्या संपर्कात आले. ही बाब राणे कुटुंबियांना कळली की त्यांची जळफळाट सुरु होत होता. सामंत यांच्या संपर्कात आलेल्‍यांना धमकावण्याचे प्रकार केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत हे करण शक्य नसल्याने निलेश राणेंनी ट्विटरवर आपला जळफळाट व्यक्त केला अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी आज व्यक्‍त केली. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि विरोधीपक्ष नेते यांची भेट झाली तर त्‍यांत वावगं काय? असाही प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला आहे.
श्री.नाईक म्‍हणाले, पालकमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडे दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी आहे. गेली २० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून ते काम पाहत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आले. दरम्यान विरोधी पक्षनेत्यांचे काही म्हणणं असेल विरोधी आमदार यांच्या काही सूचना असतील तर त्यासंदर्भात चर्चा करून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी उदय सामंत यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात भेट झाली तर त्यात वावगं असं काहीच नाही.
ते म्‍हणाले, सध्या निवडणुकीचा कालावधी नाहीय त्यामुळे वादळाच्या पार्श्वभूमीवर झालेले नेत्यांचे दौरे हे राजकीय दौरे नसून लोक हितासाठीच आहेत. पण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून ही राणे कुटुंबाची संस्कृतीचं आहे. त्यामुळेच राणेंचा नेहमी जळफळाट सुरू असतो. नारायण राणे मंत्री होते तेव्हा विरोधी पक्षाला दुय्यम स्थान द्यायचे विरोधी पक्षांनी सुचविलेली कामे डावलून टाकायचे. भर बैठकीत विरोधी आमदारांचा अपमान करायचे. परंतु उदय सामंत हे सुसंस्कृत नेते आहेत. विरोधी पक्षाचे म्हणणं ते जाणून घेतात. कोरोनाच्या या महामारीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. परंतु निलेश राणे यांच्याकडे राजकीय परिपक्‍वता नसल्‍याने राजकीय पक्ष एकत्र येणार नसून कायमच राजकारण करण्याचं काम करणार आहेत असं समजून ते पालकमंत्र्यांवर टीका करत आहेत.

1

4