कास गावातील वीज पुरवठा तब्बल चौदा दिवसांनी सुरळीत…

2

बांदा,ता.२६:
‘तौक्ते’ चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे कास गावातील वीज पुरवठा गेले चौदा दिवस खंडित झाला होता. विद्युत खांब व वाहिन्या तुटल्याने कर्मचाऱ्यांना मेहनत घ्यावी लागली. तसेच ग्रामस्थ व महावितरणचे ठेकेदार सुरेश परब यांनी सर्व यंत्रणा उभी केल्याने तब्बल चौदा दिवसांनी कास गावातील वीज पुरवठा सुरळी करण्यात यश आले.
चक्रीवादळात महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मडुरा पंचक्रोशीसह बांदा-२ अंतर्गत येणाऱ्या १४ गावांतील वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे खंडित झालेल्या गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ९० टक्के पुरवठा सुरळीत केला असून उर्वरीत भाग लवकरच उजेडात येणार असल्याचे वीज अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
‘तौक्ते’ चक्रीवादळाने बांदा-२ मधील १४ गावातील मेन लाईनचे २१ वीज खांब तर एलटी लाईनचे ३८ खांब कोसळले होते. मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यास अनंत अडचणी येत होत्या. एकूण ५९ विजेचे खांब पडले, तारा तुटल्या, जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाले. परंतु एस एस इलेक्ट्रिकल, वीज वितरण कर्मचारी व कास ग्रामस्थांनी केलेले अथक प्रयत्न यशस्वी ठरले अन बहुतांश भागातील पुरवठा सुरळीत झाला.
नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने तंत्रज्ञांची मोठी फळी मैदानात उतरवली होती. रानावनातील खांब मोडल्यामुळे खांब उभे करताना अडचणी निर्माण झाल्या. मात्र सुरेश परब यांच्या सहकार्याने वीजप्रवाह सुरळीत करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

4

4