कणकवलीत भाजी विक्रेते, फिरते विक्रेते यांचीही रॅपिड टेस्ट…

2

कणकवली, ता.२७ :  शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात विनाकारण फिरणारे, भाजीविक्रेते, व्यापारी, रिक्षा व्यावसायिक आदींचीही रॅपिड टेस्ट करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिवसभरात दीडशे रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहेत.

कणकवली शहरात वाढणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज येथील पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथकामार्फत रॅपिड टेस्ट करण्यात येत असून नगरपंचायत कर्मचारी, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या फिरत्या पथकाद्वारे देखील टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.
पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथकात समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्वी पारकर, गिलबर्ट फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर, नगरपंचायत कर्मचारी रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, संतोष राणे, रमेश कदम, यांच्यासह तालुका आरोग्य समन्वयक निखील जाधव आदी उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्यासह पोलीस पथकाने अकरा वाजल्यानंतर शहरात गस्त सुरू केली होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ यांनी पटवर्धन चौकात उपस्थित राहत या रॅपिड टेस्टचा आढावा घेतला. आतापर्यंत सुमारे २० रॅपिड टेस्ट करण्यात आले असून अद्याप एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

1

4