वेंगुर्ले नगर परिषदेचा वर्धापन दिन छोटेखानी कार्यक्रमाने साजरा… 

2

चांगली सेवा देणाऱ्या व कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचा गौरव…

वेंगुर्ले,ता.२७: नगर परिषदेच्या १४५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेकरिता सेवा बजावणा-या आणि कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह दहन करण्याचे महत्वपुर्ण कार्य करणा-या कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचा वेंगुर्ले नगर परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला.
वेंगुर्ला नगरपरिषदेचा १४५ वा वर्धापन दिन सोहळा नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कोरोना आदर्श आचारसंहितेचे पालन करुन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पाडला. २५ मे, १८७६ रोजी स्थापना झालेल्या देशातील सर्वात जुन्या नगरपरिषदेचा वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष श्रीम. अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, गटनेते श्री. सुहास गवंडळकर, श्री. महेश डिचोलकर, नगरसेवक श्री. धर्मराज कांबळी, श्री. विधाता सावंत, श्रीम. श्रेया मयेकर, श्रीम. साक्षी पेडणेकर, श्रीम. कृतिका कुबल, श्रीम. स्नेहल खोबरेकर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सदर वर्धापनदिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेकरिता सेवा बजावणाऱ्या श्री अजित गिरप, श्री राजन वेंगुर्लेकर व श्री. गणपत जाधव यांचा गौरव करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह दहन करण्याचे महत्वपुर्ण कार्य करणा-या श्री. अनिल वेंगुर्लेकर, श्री. हेमंत चव्हाण, श्री. पंकज पाटणकर व श्री. अक्षय तेरेखोलकर यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक श्री. विधाता सावंत यांनी नगरपरिषदेच्या मागील चार वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेवून राहिलेला कार्यकाल हा विरोधक सत्ताधारी असा भेदभाव न ठेवता एकदिलाने व वेंगुर्ल्याच्या विकासासाठी खर्ची घालवू असे सांगितले. तर मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या इतिहासाचा आपण भागीदार झाल्याचे भाग्य आपणांस लाभल्याचे सांगितले तसेच अध्यक्षीय भाषणादरम्यान नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप यांनी नगरपरिषदेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच त्या प्रगतीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांचे कौतुक केले. तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचा येणारा प्रत्येक वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक श्री. प्रशांत आपटे यांनी केले.

23

4