विमाकवच नाही तोपर्यंत सनियंत्रण समितीचे काम नाही…

2

तालुक्‍यातील सरपंचांची भूमिका ; कणकवली तालुक्‍यातील सरपंच, ग्रामसेवक बैठक…

कणकवली, ता.२७ : जोपर्यंत कणकवली तालुक्यातील सरपंचांचा विमा काढला जात नाही, सरपंचांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून आदेश निघत नाही तोपर्यंत तालुक्यातील एकही सरपंच ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करणार नाही. अशी आक्रमक भूमिका आज तालुक्यातील सरपंचांनी घेतली.
ग्रामपातळीवर कोविड सेंटर उभारणीबाबत शासनाकडून जे आदेश देण्यात आले. त्या आदेशाच्या अनुषंगाने आज कणकवली पंचायत समितीमध्ये तातडीने तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सभापती मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, तहसीलदार आर. जे पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ आदी उपस्थित होते.
नुसती आश्वासने आणि घोषणा नको आम्हाला लेखी पत्र द्या. गेल्यावर्षी सरपंचांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. सरपंच गावातील लोकांचा विरोध पत्करून देखील कोरोना काळात ग्राम सनियंत्रण समितीचे काम करत असताना या सरपंचाना फक्त फसवण्याचे काम सरकारने व त्याच्या मंत्र्यांनी केल्याचा आरोप सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष पिसेकमते सरपंच सुहास राणे यांनी केला. तर शेर्पे सरपंच निशा गुरव यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत मागील आश्वासनांची पूर्तता नाही मग आता कामे कशी करायची? आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला.
ज्या ठिकाणी शाळांमध्ये किंवा गावात कोविड सेंटर करण्याच्या सूचना दिल्या तेथे रात्रीच्या वेळी सुरक्षेचे उपाय योजना काय? असा सवाल कळसुली सरपंच साक्षी परब यांनी करत अधिकार्‍यांवर एकापाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यावर सभापती मनोज रावराणे यांनी आपण जनतेच्या हितासाठी व कोरोना आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. असे आवाहन करत तुमचे प्रश्न प्रशासन पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवेल अशी ग्वाही दिली. मात्र तालुक्यातील सरपंचांनी आम्हाला आता कोणतीच आश्वासने नकोत. जोपर्यंत लेखी आदेश येत नाही व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सरपंच ऐवजी तलाठी किंवा अन्य कर्मचाऱ्यांना ग्राम संनियंत्रण समितीचे अध्यक्ष करा अशी सडेतोड भूमिका सरपंच यांनी मांडली.
सरपंचांच्या या पवित्र्यानंतर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी देखील तुमचे मुद्दे बरोबर आहेत. याबाबत आजच तातडीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करतो असे आश्‍वासन दिले. मात्र तुमचे पत्रव्यवहार नको आम्हाला निर्णय हवा. व तसे आदेश हवेत. जोपर्यंत निर्णय होत नाही व आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही. अशी भूमिका सरपंच हेमंत परुळेकर यांनी घेतली.
अनेक सरपंच कोरोना पॉझिटिव्ह आले. भरणी सरपंचांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. अशा वेळी आम्ही रिस्क का घ्यायची? तुम्ही दोन दिवसात सांगता मग दोन दिवसात अन्य अधिकाऱ्यांकडे जबाबदारी द्या. दोन दिवसांनी आमच्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत आदेश आल्यानंतर आम्ही काम करू असे श्री परुळेकर यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक सरपंचांनी आपल्या समस्या मांडत प्रशासनासमोर प्रश्‍नांचा डोंगर उभा केला. मात्र अखेरपर्यंत सरपंचांनी ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास नकार असल्याची भूमिका ठामपणे मांडली.
एकापाठोपाठ एक सरपंचांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी अधिकारीदेखील निरुत्तर झाले. जोपर्यंत लेखी स्वरूपात सरपंचांचा विमा, फ्रन्टलाइन वर्कर्स, प्राधान्याने लसीकरण व अन्य मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आमच्या जवळ ग्राम सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊच नका या भूमिकेवर सरपंच ठाम राहिले.

4

4