मळेवाड-कोंडूरेतील “विलगीकरण कक्ष” येत्या दोन-तीन दिवसात सुरू होणार…

2

हेमंत मराठे; ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील रुग्णांसाठी सुविधा…

सावंतवाडी ता.२७: ग्रामपंचायत मळेवाड-कोंडूरे यांच्यावतीने गावातील कोरोना बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात हा कक्ष रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज होईल,अशी माहिती सरपंच हेमंत मराठे यांनी दिली.
गावागावात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.त्याचबरोबर होम क्वाराटाईनमध्ये जे रुग्ण राहत आहेत त्यांचे जागेअभावी हाल होत आहेत.तर काहीजण विलगीकरण असतानाही घरच्या व्यक्तींच्या संपर्कात वारंवार येत असल्याने इतरांनाही प्रादुर्भाव होत असल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर सरकारने होम आयसोलेशन बंद केले.त्यामुळे होम आयसोलेशनसाठी गावातील सार्वजनिक इमारती, शाळा, हायस्कूल ताब्यात घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतला जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या.त्यालाच अनुसरून सावंतवाडी तालुका तहसीलदार राजाराम मात्रे यांनी बुधवारी सावंतवाडी तालुक्यातील सर्व सरपंचांची बैठक घेत गावातील शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करा.या कक्षामध्ये ज्या कोरोना बाधित रुग्णांना अति जोखमीची कोणतीही लक्षणे नाहीत,अशांना त्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवा अशा सूचना दिल्या.त्यामुळे मळेवाड-कोंडुरे गावातील ज्या कोरोना बाधित रूग्णांना अतिजोखमीची लक्षणे नाहीत अशाच रूग्णांना या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून अशा रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे काम राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड शाळा नंबर १ मध्ये सुरू आहे. हा विलगीकरण कक्ष पुढील दोन ते तीन दिवसात रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.तसेच या विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांना जास्तीत-जास्त सेवा देण्याचा आपला मानस असल्याचे मत श्री.मराठे यांनी व्यक्त केले.

4

4