कोविड सेंटर उभारण्यास आमदार नाईक मुहूर्ताची वाट बघत होते का…?

2

दत्ता सामंत ; कागदी घोडे न नाचविता दोन दिवसात कोविड सेंटर उभारा…

मालवण, ता. २७ : मालवण पालिकेच्या जागेत आमदार वैभव नाईक यांनी २० बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचे मी स्वागत करतो. मात्र नाईक यांना शासकीय निधीतून हे कोविड सेंटर उभे करायचे होते तर अजूनपर्यंत ते मुहूर्ताची वाट बघत होते का ? त्यांनी आता या सेंटरची घोषणा केली आहे. आणि सरकारी काम म्हणजे ती फाईल किती अधिकाऱ्यांच्या टेबलाबरून जाणार ? आणि त्याला किती वेळ लोटणार ? हे प्रश्नच असून आमदार नाईक यांना खरोखरच रुग्णांचे प्राण वाचवायचे असतील तर त्यांनी कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सत्तेतील आमदार असल्याचा फायदा घेत दोन दिवसांत कोविड सेंटर कार्यान्वित करावे, असा सल्ला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राजकीय पक्ष प्रत्येक निवडणूकीत आपणाला अडचणीच्या ठरणाऱ्या पॉकेटमध्ये लाखो रुपये खर्च करतात, मग आज आपले मतदारच संकटात असल्याने राजकीय पुढाऱ्यांनी शासकीय निधीवर अवलंबून न राहता स्वतःचे खिसे रिकामी करून कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.
शासकीय तंत्रनिकेतन नजीक श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष दीपक पाटकर, मंदार लुडबे, संदीप भोजने, बाबू गावकर, बाबू धुरी, हेमंत चव्हाण, बाबू कासवकर, राजू बिडये, अभय कदम, महेश सारंग, उमेश बिरमोळे आदी उपस्थित होते.
कोविड काळात सर्व राजकीय पक्षानी पुढाकार घेऊन जनतेचे नाहक जात असलेले बळी थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात अलीकडे कोरोनाने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात अनेक जण सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असतानाही स्वतःची कोरोना टेस्ट न करता अंगावर ताप काढतात. खासगी डॉक्टर, मेडीकल मधून औषधे आणून घरच्या घरी स्वतः उपचार घेतात. त्यामुळे आजाराचे स्वरूप वाढून रुग्णाला श्वसनाचा त्रास सुरू होतो आणि त्यावेळी ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्ण दगावतो. त्यामुळे कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी त्वरित टेस्ट करून घ्यायला हवी. अनेकदा नागरिक कोणाला ऐकत नाहीत, आरोग्य विभागाचे कर्मचारी सांगूनही ते ऐकण्याच्या मानसिकतेत नसतात. त्यावेळी राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरत असून प्रत्येक नागरिक कोणा ना कोणा राजकीय पक्षाचा समर्थक असतो. त्यावेळी स्वतःच्या राजकीय पक्षाच्या नेत्याने अथवा पदाधिकाऱ्याने सांगितल्यास तो स्वतःची टेस्ट करून घेणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जनतेमध्ये कोरोना बाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. आमच्या घुमडे गावात तब्बल ४२ कोरोनाचे रुग्ण मिळून आले होते. मात्र लक्षणे दिसून येतात आम्ही ग्रामस्थांना आरटीपीसीआर टेस्टसाठी वेळीच बाहेर काढल्याने पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण आज ठणठणीत आहेत. या कामी चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. नाटेवाड यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यास जिल्हा १०० टक्के कोरोना मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कोविड काळात योग्य खबरदारी घेतल्यास संसर्ग टाळता येऊ शकतो असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
आपल्याला कोणतीही निवडणूक लढवायची नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे काम करत असून प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने देखील अशीच मदत देण्याची गरज आहे. परमेश्वराने हे संकट लवकरात लवकर दूर करो, अशी प्रार्थना आपण करत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
श्री. सामंत यांनी यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्यासह कोविड काळात रुग्णसेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. माझ्याकडे कोरोनाचे रुग्ण आल्यानंतर वेळी अवेळी डॉक्टरांकडे आपण संपर्क केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही टाळाटाळ न करता त्यांच्यावर योग्य उपचार केले. आज शासन कोरोनावर नियंत्रणासाठी औषधे उपलब्ध करून देत नाही. किमान कोविड काळात रुग्णसेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तरी वेळेत पगार द्यावेत, असे सामंत यांनी सांगितले.

1

4