चार दिवसांत मागणी प्रमाणे खत उपलब्ध करा,अन्यथा सर्वपक्षीय कार्यालयात घुसतील…

2

रणजीत देसाई; कृषी समिती सभेत संबंधित अधिकाऱ्यांना दिला इशारा…

सिंधुदुर्गनगरी ता.२७: जिल्ह्याला मागणी प्रमाणात खत पुरवठा अद्याप झालेला नाही.गतवर्षी सुद्धा तीच स्थिती होती.त्यामुळे पुढील चार दिवसांत मागणी प्रमाणे खत उपलब्ध न झाल्यास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तुमच्या कार्यालयात घुसतील, असा इशारा गटनेते रणजीत देसाई यानी गुरुवारी झालेल्या कृषि समिती सभेत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस एन म्हेत्रे यांना दिला.आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आता माघार घेणार नाही, असाही सूचक इशारा त्यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या कृषि समितिची सभा गुरुवारी ऑनलाईन सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सचिव तथा जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य रणजीत देसाई, गणेश राणे, संजय देसाई, अनुप्रिती खोचरे, सायली सावंत यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी १७ हजार ५७० मेट्रिक टन खताची मागणी असताना केवळ २ हजार ९०२ मेट्रिक टन खत उपलब्ध झाल्याचे पुढे आले. तर सुधारित व संकरित मिळून ७ हजार ९७५ क्विंटल बियाण्याची मागणी असताना केवळ २ हजार ७४७ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे, अशी वस्तुस्थिती उपाध्यक्ष म्हापसेकर यानी मांडली.
त्यामुळे रणजीत देसाई संतप्त झाले. यामध्ये झारीतील शुक्राचार्य नेमका कोण आहे ? असा प्रश्न करीत “आता आम्ही गप्प बसणार नाही. आमचा शेतकरी कोरोनाची बंधने असताना तीन-चार वेळा सोसायटी, खरेदी-विक्री संघ येथे खत व बियाणे विक्रीसाठी जात आहे. परंतु त्यांना ते मिळत नाही. कंपनी पुरेसे खत द्यायला तयार आहे. आमच्या प्रशासनाने वेळेत मागणी केली आहे. मग अडले कुठे ?”, असा प्रश्न देसाई यानी करीत चार दिवसात मागणीचा पुरवठा न झाल्यास राज्य शासनाच्या कृषि कार्यालयात सर्वपक्षीय घुसणार, असे सांगितले. यावेळी म्हापसेकर यानी कोणत्याही क्षणी जिल्ह्यात मान्सून दाखल होवू शकतो. आता जर खत आणि बी मिळाले नाही तर शेतकरी खरेदी करणार कसे ? पाऊस सुरु झाला की वाहतूक करणार कसे ? असे प्रश्न उपस्थित केले. मात्र, ही चर्चा सुरु असताना जिल्हा कृषि अधीक्षक म्हेत्रे हे ऑनलाईन वरुन गायब झाले.

3

4