गावागावात कोविड सेंटर करण्यास भाजपचा विरोध

2

संतोष कानडे : गावागावात वाद होण्याची भीती

कणकवली, ता.२८ : सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोन मध्ये असून ठाकरे सरकारने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावातच कोविड केअर सेंटर करण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नसताना १५ व्या वित्त आयोगातून कोविड केअर सेंटर केल्याने गावागावात वाद होण्याची भीती आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा त्याला विरोध आहे.ठाकरे सरकारने स्वतःचे पाप झाकण्यासाठी ग्रामपंचायतीचा बळी देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी आज केला.
श्री.कानडे म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून कोरणा संसर्गाच्या नियमांची अंमलबजावणी करताना अनेक वाद निर्माण झाले आहेत. पुन्हा कोविड केअर सेंटर केल्यामुळे आणखीन वाद निर्माण होण्याची गावागावात शक्यता आहे. नियम अंमलबजावणी करतानाच लोकांमध्ये सरपंच व त्या समिती विरोधात रोष निर्माण झालेला आहे. त्या सरपंचांना अद्यापही विमा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आणखीन जबाबदारी टाकून ठाकरे सरकार सरपंच व त्या समिती विरोधात आणखीन रोष निर्माण करायला बघत आहे. स्वतःचे पाप झाकून ठेवण्यासाठीच हा ठाकरे सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही संतोष कानडे यांनी केला आहे.

6

4