मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांवर कोरोना चाचणी सुरू करा…

2

राजन मुळीक यांची आरोग्य विभागाकडे मागणी; एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळा…

सावंतवाडी ता.२८:
ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र होणारी गर्दी टाळण्यासाठी आरोग्य खात्याने यापुढे मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील उपकेंद्रावर सुद्धा कोरोना चाचणी सुरू करावी,अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजन ऊर्फ राजू मुळीक यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्टिंग, तसेच लसीकरण किंवा अन्य रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या प्राथमिक केंद्रात वीसच्या आसपास गाव जोडली गेली असून, येथील अनेक व्यक्ती कोणी लसीकरणासाठी, तर कोणी कोरोना टेस्टिंगसाठी येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढत असून सोशल डिस्टन्सिंग राखणे अवघड बनत आहे.
गावात व आजूबाजूच्या परिसरात सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने त्वरित उपकेंद्रातच कोरोना चाचणी सुरू करून प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडणारा ताण कमी करावा. कोरोना अहवाल दोन दिवसांनी मिळत असल्याने योग्य उपचाराअभावी रुग्ण मृत्यू झाल्याचा तक्रारी येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने याची दखल घेऊन तात्काळ मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व उपकेंद्रात कोरोना चाचणी सुरू करण्याची मागणी राजन मुळीक यांनी प्रशासनाकडे केली आहे.

9

4