तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रास्त भरपाई द्यावी…

2

विभावरी सुकी;नाना पटोले यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी…

सावंतवाडी,ता.२८:तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे कृषि,वनविभाग व महसूल विभागाकडून एकत्रित पंचनामे व्हावे,तसेच सह्याद्री पट्ट्यातील पंचनामे करून शेतकऱ्यांना रास्त भरपाई दयावी,अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी विभावरी सुकी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सिंधुदुर्ग दौ-यात या विषयावर चर्चा केली आहे.तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर जसे नुकसान झाले तसे सह्याद्रीच्या पट्यात ही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नारळ, सुपारी, काजू, आंबा केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. फणस, कोकम, आंबा, जांभळ, सागवान, माढ इ. झाडे उन्मळून पडून प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अनेक घरे, दुकाने, शेतघरे यांची छपरे उडून पडझड झालेली आहे. ६ व ७ मे २०१७ रोजी झालेल्या फयान चक्रीवादळामुळे अशाच प्रकारे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी कृषि विभागाने केवळ बांदा परिसरातील चौदा गावांमध्ये ५ कोटी ६३ लाख रूपये नुकसान झाल्याचे पंचनामे केले होते. तर संपूर्ण जिल्हयामध्ये २५ कोटीहून अधिक नुकसानीचे पंचनामे झाले होते. त्यातील काहि नुकसानीची रक्कम आजतगाय शेतकऱ्यांना मिळाली नाही.असे सुकी यानी पटोले यांच्या निदर्शनास आणून दिले.
घाटमाथ्यावर अथवा इतरत्र पिकांचे नुकसान होते. त्या पिकांचा कालावधी वर्षभराचा असतो. परंतू आपल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील जी फळझाडे आहेत त्यांचे आयुष्यमान २० वर्षे ते ६०-७० वर्षे असते. अशी फळझाडे मोडली अथवा उन्मळून पडली तर फार मोठे नुकसान होते. त्यांच्या नुकसानीची भरपाई त्यांचा वयाप्रमाणे मिळावी तसेच सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे कृषि, वनविभाग व महसूल खात्याने एकत्रि पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य न्याय दयावा व शेतकऱ्यांना रास्त भरपाई दयावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

0

4