करुळ घाटात स्कूटीसह चालक कोसळला दरीत….

2

आपत्ती प्रशासनाच्या या रंगीत तालीमने संबंधित यंत्रणा झाल्या खडबडून जाग्या…

वैभववाडी,ता.२८:करूळ घाटात स्कूटीसह चालक दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती तालुका आपत्ती प्रशासनाकडून मिळतात संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीसांची गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी रुग्णवाहिकेसह करूळ घाटात पोहचले. नेहमी मदत कार्यात तत्पर असणारी करुळ गावातील सह्याद्री जीव रक्षक टीम घटनास्थळी पोहोचली. तहसीलदार रामदास झळके महसूल यंत्रणेसह अगोदरच घाटात दाखल झाले होते. संबंधित विभागातील सर्व कर्मचारी घाटात पोहचल्यानंतर ही आपत्ती प्रशासनाची रंगीत तालीम असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. तहसीलदार श्री. झळके यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

जिल्हा आपत्ती प्रशासनाकडून दरवर्षी प्रत्येक तालुक्यात यंत्रणा किती अलर्ट आहे. याचा अंदाज घेण्यासाठी मॉक ड्रील (रंगीत तालीम) घेत असते. वैभववाडी तालुका आपत्ती प्रशासनाने देखील ही तालीम घेत संबंधित यंत्रणेला जागे केले. तहसीलदार रामदास झळके यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना स्वतः कॉल करत, त्वरित घाटात पोहोचा. अपघात झाला आहे. असे सांगितले. पोलीस, आरोग्य विभाग घटनास्थळी दाखल झाला. करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमही तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पोहोचल्यानंतर सर्वांना कळले हा अपघात नसून ही प्रशासनाची रंगीत तालीम. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
यावेळी करूळ घाटात पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी धर्मे, सह्याद्री जीव रक्षकचे प्रमुख हेमंत पाटील, मंडळ अधिकारी दीपक पावसकर, पोलीस कर्मचारी मारुती साखरे, गणेश भोवड, श्री पडवळ, महिला पोलीस पद्मीनी मयेकर, सौ. आडुळकर, श्री सावंत, अमर शिंदे, विजय सावंत, श्री. माने, स्वप्नील इस्वलकर व कर्मचारी उपस्थित होते.

 

2

4