सिंधुदुर्गातील व्यापार १ जूनपासून सुरू करावा…

2

विजय केनवडेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

मालवण, ता. २८ : सिंधुदुर्गातील व्यापार १ जूनपासून खुला करण्यात यावा अशी मागणी भाजपा उद्योग व्यापारचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. काही तालुक्यातील बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनी जनता लॉकडाऊनमध्ये सहकार्य केले आहे. ४५ दिवस व्यापार उद्योग बंद आहेत. मागील वर्षापासून व्यापारी आर्थिक खाईत लोटला गेला आहे. बँका कर्जाच्या हप्त्यासाठी थांबत नाहीत. काही बँकांनी कारवाईस सुरवात केली आहे. काही व्यापार्‍यांचा माल वापराविना खराब झाला आहे. तौक्ते वादळाने किनार पट्टीच्या व्यापार्‍यांचे बरेच नुकसान झाले आहे. छोटे व्यापारी, पानपट्टी व्यापारी, केशकर्तनालय, कापड व्यापारी, चप्पल दुकानदार, सौंदर्य प्रसाधन यांचा पूर्ण व्यवसाय संपला आहे. असणारी बचत व्यापारात घालून व्यवसाय सुरु केला असतानाच दुसर्‍या लॉकडाऊनमुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या संपला आहे. विद्युत बील, घरपट्टी, टॅक्स, कामगारांचा पगार देताना नाकीनऊ आले आहेत. या परिस्थितीचा विचार करून १ जूनपासून व्यापार खुला करावा अशी मागणी श्री. केनवडेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

1

4