उशिराने जागे झालेल्या सामंतांनी आमदारांना सल्ले देऊ नयेत…

2

मंदार केणी ; आपले अस्तित्व दाखविण्यासाठीच त्यांची धडपड सुरू…

मालवण, ता. २८ : कोरोनाची एक लाट गेल्यानंतर दुसर्‍या लाटेत आपल्या गावातील ४२ कोरोना पॉझीटिव्ह आल्यानंतर उशिराने जाग आलेल्या दत्ता सामंतांनी आमदार वैभव नाईक यांना सल्ले देऊ नयेत. हे रुग्ण नाईक यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन येथे साकारलेल्या कोवीड सेंटरमध्येच बरे झाले आहेत. खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे हे सामंतांची दखल घेत नसल्यानेच आपले अस्तित्व दाखविण्यासाठीच आमदारांवर टीका करण्याची त्यांची धडपड सुरू असल्याची टीका मालवण पालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी यांनी पत्रकातून केली आहे.
२० बेडचे कोविड सेंटर उभारण्यासाठी आमदार नाईक मुहूर्ताची वाट पाहत आहे का? अशी टीका भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला केणी यांनी पत्रकातून उत्तर दिले आहे. श्री. केणी म्हणाले, घुमडे गावात कोरोनाचे जे रुग्ण सापडले ते आमदार नाईक यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन येथे साकारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्येच बरे झाले आहेत याची जाणिव सामंत यांनी ठेवायला हवी. कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करून सातत्याने त्याठिकाणी काम करणार्‍यांपैकी एक आमदार नाईक आहेत. कोरोना काळ असो किंवा वादळ असो, पहिल्या दिवसापासून आर्थिक मदत असो किंवा शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार प्रयत्नशील आहेत. यात त्यांचा कुठलाही देखावा नाही. त्यामुळे दत्ता सामंत यांनी मदत करण्यात सातत्य दाखवावे. आम्ही त्यांचे स्वागत करू. परंतु सामंत निवडणूक काळात आर्थिक खर्चात जसा पुढाकार घेतात तसेच आता वादळाने नुकसान झालेल्या गावात जाऊन त्यांनी मदत करावी. देवबागसारख्या गावात पाचशे मीटरचा बंधारा स्वखर्चातून बांधून देण्याची घोषणा करणार्‍या सामंतांनी गावात केवळ दोन टँकर पाणी देणे हे त्यांना शोभत नाही असा टोलाही श्री. केणी यांनी लगावला आहे.
नारायण राणे, नीलेश राणे यांनी आपल्या दौर्‍यात दत्ता सामंत यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आपले अस्तित्व दाखविण्यासाठीच सामंत यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या जागेत आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून २० बेडचे ऑक्सीजनयुक्त कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ पत्रकार परिषदा न घेता त्याठिकाणी जातीनिशी लक्ष ठेवत सर्वसामान्यांना मदत करण्याचे काम करायला हवे असेही श्री. केणी यांनी म्हटले आहे.

1

4