शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास नगराध्यक्ष, मुख्याधिकारी जबाबदार…

2

वराडकर- कुशे यांचा आरोप ; जनतेनेच पालिकेची लाज वाचविली…

मालवण, ता. २८ : शहरातील विविध समस्यांबाबत पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष निद्रीस्त आहेत. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेत नियोजन व्हायला हवे होते. पालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. मुख्याधिकारी वादळाबरोबर गुजरातला गेले की काय? असा प्रश्‍न उपस्थित करत वादळामुळे निर्माण झालेल्या समस्येला तसेच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप पालिकेचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पालिकेच्या उपनगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद झाली. श्री. वराडकर म्हणाले, शहरात ज्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत त्याला पालिका प्रशासन जबाबदार आहे. वादळाचा तडाखा शहराला बसणार याची कल्पना असताना सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेत नियोजन करायला हवे होते. मात्र नगराध्यक्ष केवळ एकाच नगरसेवकाला सोबत घेऊन फोटोसेशन करण्यात दंग होते. नियोजनाअभावी शहरात कचर्‍याचे सर्वत्र ढीग साचल्याचे चित्र आहे. प्रशासनाने योग्य नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. स्वच्छता कर्मचारी, गाड्या नाहीत आणि मुख्याधिकारीही नाहीत. त्यामुळे वादळाबरोबर मुख्याधिकारी गुजरातला गेले की काय? असा प्रश्‍न श्री. वराडकर यांनी उपस्थित केला. कोरोना पॉझीटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारीच कचरा उचलण्याचे काम करत होते. यातील आता सहा कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह झाले असून त्यांचे कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याला पालिका प्रशासन जबाबदार आहे. कोरोना पॉझीटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा अंत्यविधीसाठी निविदा काढण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अंत्यविधी करणारे जे कर्मचारी आता कोरोना पॉझीटिव्ह सापडले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी श्री. वराडकर, श्री. कुशे यांनी केली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मुख्याधिकार्‍यांनी २४ तास मुख्यालयात राहणे आवश्यक असताना ते ओरोस येथे वास्तव्यास होते. यावरून शहराच्या बाबतीत ते किती गंभीर आहेत हे दिसून येते. नगराध्यक्षांचा त्यांच्यावर अंकुश नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा जवळ आला असताना गटार खुदाई, व्हाळ्या सफाईची कामे झालेली नाहीत. ठेकेदार आणि त्यांचे कामगार गायब आहेत. प्रत्यक्षात ठेकेदाराने २० कामगार पुरविण्याचा आदेश असताना केवळ चारच कामगार त्याने उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांनी कोणती कारवाई केली. संबंधित ठेकेदाराला का पाठीशी घातले जात आहे असा प्रश्‍न श्री. वराडकर यांनी उपस्थित केला आहे.
शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेधडक फिरत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराच्या ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्राचे फलक न लावण्यामुळेच शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून याला नगराध्यक्ष व पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप श्री. वराडकर यांनी केला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत गेल्या दोन वर्षात एकही बैठक नगराध्यक्षांनी घेतली नाही. नगरसेवकांना विश्‍वासात घेत उपाययोजना राबविली असती तर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळाली असती असे श्री. वराडकर यांनी सांगितले.
तोक्ते वादळाच्या तडाख्यात शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक झाडे, विद्युत खांब कोसळून नुकसान झाले. ही झाडे हटविण्यासाठी तसेच विद्युत खांब उचलण्यासाठी स्थानिक नागरिकांनीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. पालिका प्रशासनाकडून कोणतेही नियोजन नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. यामुळे पालिकेची लाज सर्वसामान्य नागरिकांनी वाचविली. यात नगराध्यक्ष फुकटचे श्रेय घेत असल्याचे श्री. वराडकर यांनी सांगितले.

3

4