वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार

2

वेंगुर्ले,ता.२९: पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी कारण नसताना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची धमकी देऊन आपल्या कॉलरला धरुन फरफटत ओढून मारहाण केली. तसेच गळ्याला नखे लावून दुखापत केली असा आरोप करत वेंगुर्ला येथील व्यावसायिक आदित्य हळदणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
आदित्य सुभाष हळदणकर याने दिलेल्या तक्रार वजा निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २४ मे २०२१ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास मी व माझा मित्र त्याच्या रामेश्वर मंदीर शेजारील घरा समोर उभ्या असलेल्या त्याच्या चार चाकी गाडीमध्ये बसलेलो असताना एक पोलिस हे गाडी जवळ येऊन गाडीची काच खाली करण्यात सांगितली व पोलीस निरीक्षक यांनी तुम्हाला तात्काळ बोलावले आहे असे सांगितले. त्यावेळी मी लगेचच गडबडित मास्क विसरून गाडीकडे गेलो असता तानाजी मोरे यांनी मला तुझे मास्क कोठे आहे? असे विचारले, त्यावर मी त्यांना असे सांगितले की, साहेब मास्क गाडीमध्ये आहे. व आपल्या पोलिसांनी ताबडतोब ये असे सांगितल्याने मी ताबडतोब आलो त्यामुळे मास्क लाययाला विसरलो, थांबा मी लगेच मास्क लावून येतो. त्यावर
मोरे यांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरले व माझ्या शर्टच्या कॉलरला पकडून मला फरफटत गाडीमध्ये बसविण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्याला त्यांची नखेही लागली. तरी देखील ते मला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते. तसेच मी तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतो, मी पोलिस निरीक्षक आहे. कोणी माझे काहीही करू शकत नाही असे सांगितले.
दरम्यान या प्रकारामुळे मी भयभीत झालेलो असून पोलिस निरीक्षक तानाजी मोरे हे आपल्या पदाचा गैरवापर करून माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून माझ्या जिवाचे काहीतरी करण्याच्या इराद्यात आहेत. त्यांच्या पासून माझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे माझे काही बरेवाईट झाल्यास त्यास देखील तानाजी मोरे हे सर्वस्वी जबाबदार राहतील. तसेच त्यांनी भर रस्त्यात माझ्या कॉलरला पकडून फरफटत ओढून मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याने मी प्रचंड मानसीक तणावाखाली आहे. त्यामुळे श्री. मोरे यांनी कोणतेही कारण नसताना माझा कॉलरला पकडून माझ्या मानेला आपली नखे लावून मला दुखापत करुन मला फरफटत ओढत नेले व अश्लील भाषेत आई-बहिणीवरून शिवीगाळ करून मला मारहाण केल्या प्रकरणी तानाजी मोरे यांच्यावर गुन्हा करुन यांच्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करावी व मला न्याय मिळावा अशा प्रकारे मागणी आदित्य हळदणकर याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

5

4