शिवसेनेच्या चिल्लर गँगची ‘स्वार्थी’ कोल्हेकुई…

2

सुनील घाडीगावकर यांचा पलटवार ; मंदार केणी यांची दत्ता सामंतांवरील टीका हास्यास्पद…

मालवण, ता. २९ : विधानसभा निवडणुकीत रडीचा डाव खेळून शिवसेनेने दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. अन्यथा त्याचवेळी आमदार वैभव नाईक यांचा पराभव निश्चित होता. आजही आमदार नाईक यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन सामंत यांच्या विरोधात जिंकून दाखवावे त्यानंतरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हेकुई करावी. शिवसैनिकांना डावलून स्वतः पदे घेऊन स्वार्थ साधणाऱ्या मंदार केणींनी सामंत यांच्यावर टीका करणे हे हास्यास्पदच म्हणावे लागेल. असा जोरदार पलटवार पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांनी केला आहे.
बांधकाम सभापती मंदार केणी यांनी भाजप नेते दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टीकेला सुनील घाडीगावकर यांनी प्रत्युत्तर देताना मंदार केणी यांच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. पत्रकात घाडीगावकर म्हणाले, आमचे नेते नारायण राणे यांनी मंदार केणी यांना तालुकाध्यक्ष पद दिले होते. त्यावेळी त्यांनी काय दिवे लावले व आता शिवसेनेत प्रवेश करून स्वतःचा स्वार्थ कसा साधत आहेत. निष्ठावान शिवसैनिकांना बाजूला सारत आपल्या पदरात पदे घेऊन केवळ आमदार, खासदारांना खुश ठेवण्याचे काम मंदार केणी दिवसभर करतात. ते शिवसेनेत प्रवेश करताना निष्ठावान शिवसैनिकानी त्यांना आधी केलेल्या वक्तव्या बद्द्ल जाहीर माफी मागायला लावली होती यावरूनच केणी यांची किंमत दिसून येते.
दत्ता सामंत हे गेली अनेक वर्ष समाजकारण करून राजकारण करत आहेत. नारायण राणेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून गोरगरीब जनतेला मदत कार्य करणे यात त्यांचे सातत्य आहे. आता कोरोना काळातही ऑक्सिजन पुरवठ्यासह अन्य औषधोपचार व मदतकार्य हे सातत्याने करत आहेत. त्यामुळेच जनतेतून सामंत यांच्याबद्दल वाढत जाणारी लोकप्रियता पाहता पायाखालील वाळू सरकल्याने आमदार व त्यांचे कार्यकर्ते सैरभैर होऊन टीका करण्याचे काम करत आहेत. मात्र, जनतेला सत्यता माहीत असून कोण काम करतो आणि कोण राजकारण करतो हे जनता ओळखून आहे. तेव्हा यापुढे सामंत यांच्याबद्दल टीका टिपणी केल्यास जसेच्या तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा श्री. घाडीगावकर यांनी दिला आहे.
दत्ता सामंत हे शिवसेनेत यावेत यासाठी शिवसेनेचे नेते मंडळी दत्ता सामंत यांच्याशी संपर्क करून विनवण्या करीत होते. मात्र नारायण राणेंचे निष्ठावान असल्याने शिवसेनेच्या नेते मंडळींना सामंत भीक घालत नसल्याने केवळ बदनामी करण्याच्या हेतूने शिवसेनेच्या चिल्लर गँगची कोल्हेकुई सुरू आहे. असा टोला घाडीगावकर यांनी लगावला आहे.

2

4