गोळवणच्या कृषी सहायकाची गळफास लावून आत्महत्या…

2

कट्टा येथील घटना ;आत्महत्येचे कारण अस्पष्ट…

मालवण, ता. २९ : तालुक्यातील गोळवण येथे कृषी सहायक म्हणून काम पाहणारे विशाल गंगाधर हंगे (वय-२७) रा. लोणार- बुलढाणा यांनी आज सकाळी भाड्याच्या खोलीत दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबतची माहिती विजय कांबळे यांनी पोलिसांत दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी- मालवण तालुका कृषी विभागात सेवेस असलेले विशाल हंगे हे गोळवण येथे कृषी सहायक म्हणून सेवा बजावत होते. ते कट्टा येथे कृषी सहायक विजय कांबळे यांच्यासोबत भाड्याने राहत होते. काल सायंकाळी ते काम आटोपून भाड्याने राहत असलेल्या ठिकाणी आले. सहकारी मित्र विजय कांबळे यांनी रात्रीचे जेवण करून त्यांना जेवणासाठी बोलाविले. मात्र त्यांनी तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवतो असे सांगून खोलीत आपले काम सुरू ठेवले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान कांबळे यांना विशाल यांनी आपल्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती कट्टा पोलिस दुरक्षेत्रास दिली. त्यानुसार पोलिस कर्मचारी रुक्मांगद मुंडे, योगेश सराफदार, संतोष पुटवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनीही घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. याबाबतची खबर विजय कांबळे यांनी पोलिसांत दिली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

31

4