सावंतवाडी बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी वाॅर्ड निहाय भाजी-फळे व मासे विक्री करण्यास परवानगी द्या…

2

परिमल नाईकांची मुख्याधिकऱ्यांकडे मागणी; किराणा व्यापाऱ्यांना होम डिलिव्हरी देण्यास विनंती करा…

सावंतवाडी ता.३०:  येथील बाजारपेठेत सकाळच्या वेळेत होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची भीती आहे.त्यामुळे शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी वाड्या-वाड्यांवर व वाॅर्ड निहाय भाजी-फळे व मासे विक्री करण्यास परवानाधारक व्यावसायिकांना परवानगी द्या,त्यासाठी या सेवेत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सामावून घ्या,तसेच किराणा व्यापाऱ्यांना होम डिलिव्हरी वर भर देण्याची विनंती करा,अशी मागणी नगरसेवक परीमल नाईक यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,शासनाच्या नियमानुसार सध्या आपल्या शहरातील बाजारपेठ व इतर अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत.बाजारपेठेतील वाढत्या गर्दीचा विचार करता अल्प कालावधीत बाजारपेठ केंद्रीकरण झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही. पर्यायाने कोरोना विषयक शासकीय नियम व अंमलबजावणीचा सुद्धा फज्जा उडताना प्रकर्षाने दिसत आहे.परिणामी आपल्या आरोग्य व इतर यंत्रणेवर सुद्धा अवाजवी ताण येत आहे.
बाजार पेठेतील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वाड्या – वाड्यावर, वॉर्ड निहाय परवाना धारक भाजी, फळे, मासे विक्रेते यांना स्वच्छतेविषयी अटी व शर्ती घालून परवानगी दिल्यास व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना त्या मध्ये सामावून घेतल्यास तसेच किराणा व्यापाऱ्यांना विनंती करून होम डिलिव्हरी वर भर दिल्यास बरेच प्रमाणात बाजारपेठचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण व काबू ठेवता येईल,परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांवर सुद्धा अन्याय होणार नाही व पर्यायाने कोरोना विषाणूचा फैलाव रोखून खऱ्या अर्थाने महामारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

2

4