माझ्या राजीनाम्याने मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर राजीनामा देऊ…

2

 

छत्रपती संभाजीराजे ; सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनावर आपला भर राहणार…

मालवण, ता. ३१ : मराठा आरक्षणावर माझी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. जर मी राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन असे स्पष्ट करत छत्रपती संभाजीराजेंनी राजीनाम्याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
तौक्ते चक्रीवादळामुळे येथील किल्ले सिंधुदुर्गवर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे येथे दाखल झाले. मात्र समुद्र खवळला असल्याने त्यांनी बंदर जेटीवरूनच त्यांनी छत्रपतींचे दर्शन घेत अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले, तौक्ते वादळामुळे किल्ले सिंधुदुर्गवर झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी येथे आलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यात त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवराजेश्‍वर हे पहिले मंदिर बांधले तर या मंदिराचा सभामंडप राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधला. तेव्हापासून दरवर्षी कोल्हापूरच्या छत्रपतींकडून या मंदिरात शिवाजी महाराजांना पेहेराव दिला जातो. हा पेहेराव देण्यासाठी आपण दरवर्षी किल्ल्याला भेट देतो. मात्र कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात आपण येथे येऊ शकलो नाही. त्यामुळे पेहेराव देण्यासाठी, शिवरायांना वंदन करण्यासाठी आणि त्याचबरोबर किल्ल्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपण आलो आहोत. समुद्र खवळलेला असल्याने मला किल्ल्यावर जात नुकसानीची पाहणी करता आलेली नाही. मात्र लवकरच किल्ल्यास भेट देऊ.
गेली शेकडो वर्षे प्रतिकूल परिस्थितीत किल्ल्यातील रहिवासी वास्तव्यास आहेत. त्यांना कशाप्रकारे मदत होईल यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे. पावसाळा सुरू झाला असून किल्ल्यातील कामे कशी पूर्ण करता येतील याबाबतही चर्चा केली जाईल. सिंधुदुर्ग किल्ला हा कोल्हापूर संस्थांनच्या हद्दीतील किल्ला होता. त्यामुळे या किल्ल्याची जबाबदारी आमचीही आहे असे मी समजतो. किल्ल्याचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी आपण खास परवानगी घेतली आहे. रायगड प्राधिकरण अंतर्गत आपण रायगड किल्ल्याचे काम करत आहोत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. मात्र येथील जिल्हाधिकार्‍यांनी किल्ल्यातील शिवरायांच्या मंदिराच्या सभामंडपच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांच्या विभागाकडून करून घेण्याचे म्हटले होते. तरीही किल्ल्यात कोणत्या सुविधा निर्माण करता येतील याबाबत आपण जिल्हाधिकार्‍यांशी बोलणार असल्याचे छत्रपतींनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजी राजे यांना विचारले असता त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे वृत्त फेटाळले. आपण राजीनामा दिल्याने आरक्षण मिळणार का ? राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर आपण राजीनामा देतो असे सांगत राजीनाम्या बाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मराठा आरक्षणावर आपण आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मी समाजासाठी काम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना बारा बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण केले. शाहू महाराजांनी १९०२ मध्ये बहुजन समाजाला आरक्षण दिले. त्यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा समाज यांचा समावेश होता. त्यामुळे बहुजन समाजाला न्याय देताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आपली भूमिका आहे. मी कोणावर टीका करत नाही आणि जे टीका करतात तो ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. मी मराठा समाजाला दिशा देण्यासाठी व न्याय देण्यासाठी काम करत असल्याचेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले.

2

4