कोरोनाग्रस्तांचे मृतदेह जाळणाऱ्या ठेकेदाराने मृतांच्या नातेवाईकांना लुटले…

2

परशुराम उपरकरांचा आरोप;बिल रोखण्यासह झालेल्या प्रकाराची चौकशीची मागणी…

कणकवली,ता.३१: कोरोना मृतांचे मृतदेह जाळण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडल्याचा आरोप आज येथे मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. सरकारी तिजोरीतून त्या ठेकेदाराला प्रत्येकी पंधरा हजार रुपये दिले जात असताना उलट त्याने नातेवाईकांकडून डबल पैसे घेतले. त्यामुळे या प्रकाराची गंभीर चौकशी करण्यात यावी,तसेच त्याचे त्रेचाळीस लाखाचे बिल रोखून धरण्यात यावे,अशीही मागणी उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
सदर ठेकेदाराला सुरुवातीच्या काळात १५ हजार व आता सध्या १० हजार मृतदेह जाळण्याकरिता दिले जात असल्याचे समजते. त्यामध्ये रुग्णालयातून प्रेत जाळण्याच्या ठिकाणी रुग्णवाहिकेने नेवून प्रेत जाळण्याकरिता लाकडांसहीत पैसे दिले जात होते. सदर ठेकेदाराला प्रशासनाने कोरोना आजारातील रुग्णालयातील मृतदेह मोफत जाळण्याचे काम दिले होते. त्याचे पैसे शासन देत आहे. परंतु याची कल्पना पेशंटच्या नातेवाईकांना नव्हती. त्यामुळे सदर ठेकेदाराने पेशंटच्या कुटुंबियांकडून दहा हजार ते पंधरा हजार पर्यंत रुपयांची मागणी केलेली आहे. त्यामुळे अशा ठेकेदाराने लुबाडलेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी एका रुग्णवाहिका मालकाची काळी कृत्ये समोर आल्यानंतर आता या ठेकेदाराचीही लुबाडणुक लोकांसमोर येत आहे. या रुग्णवाहिका ठेकेदाराने आपल्याकडून पैसे घेतल्याचे काही नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे कळविले आहे. तसेच मृत्यूदर जास्त असताना या ठेकेदाराने एकाच सरणावर दोन ते तीन प्रेतं रचून जाळली आहेत. अशाने त्याने कमी लाकडात दहन केले आहे. तसेच अर्धवट जळलेल्या प्रेतांवर पेट्रोल, डिजेल टाकून ते जाळली आहेत, अशा अनेक तक्रारी मनसेकडे आलेल्या आहेत. यामध्ये लोकांच्या भानवेचाही खेळ झालेला आहे. तसेच मृत व्यक्तीच्या अस्ती मिळवण्यासाठीही पेशंटच्या कुटुंबियांकडून सदर ठेकेदाराने पैशे उकळले आहेत. तसेच एकाच सरणावर दोन ते तीन प्रेतं जाळल्यामुळे कोणाच्या अस्ती कोणाकडे गेल्या याचीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे कोकणी माणसाची संस्कृती दुखवून भावनांचा खेळ रचला गेला आहे.
सदर ठेकेदाराबाबत कोणा-कोणाकडून पैसे घेतले आहेत याबाबतची चौकशी करून त्यांचे बिल सुमारे ४३ लाखांचे असून सध्या ३६ लाखांचे बिल सादर केल्याचे समजते आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत सदर बिल रोखण्यात यावे. तसेच आरोग्य तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून सदर बिलाबाबत चौकशी करण्यात यावी. तसेच नातेवाईकांचे डबल पैसे घेतले असल्यास त्यांना परत करावे, अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच सदर ठेकेदार आपले पितळ उघडे पडू नये व जनतेला खरं समजल्याने आपल्यावर कारवाई होईल, अशा भीतीने ताताडीने व लगबगीने बिलांसाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मनसे या प्रकाराची सखोल चौकशी करून बिले अदा करून कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

3

4