मराठा बांधवांनी आक्रोश जनआंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा…

2

अनुश्री माळगावकर; ५ जूनला बीड येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन…

बांदा ता.०१: मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात राज्य सरकार बाजू मांडण्यात अयशस्वी झाल्याने कोर्टाने आरक्षण रद्द केले आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा मराठा समाज आज हतबल झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याशी एकनिष्ठ असणार्‍या शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी ५ जून रोजी बीड येथे आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.या मोर्चासाठी सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसंग्रामच्या मुंबई अध्यक्षा तथा डिंगणेच्या सुकन्या अनुश्री माळगावकर यांनी केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात सर्व जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे नेण्यात आले. लाखो मराठा बांधव व भगिनींच्या मोर्चामुळे राज्य सरकारही हादरले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने दिलेले आरक्षण काही अटी घालत रद्दबातल ठरविले. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले असून समाजात मरगळ पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर आ. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठा समाजाचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही अशी शपथ घेत आ. विनायक मेटे यांनी ५ जून रोजी बीड येथे जनआंदोलन उभारले आहे. या जनआंदोलनात आ. विनायक मेटे, आ. भारती लवेकर, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, महाराष्ट्र राज्य सचिव व मुंबई प्रदेश प्रभारी सत्यवान राऊत यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी व मराठा समाजाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या आक्रोश मोर्चात सिंधुदुर्गातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. विनायक मेटे यांच्या आदेशाने मुंबई अध्यक्षा अनुश्री माळगावकर यांनी केले आहे.

1

4