राणेंचा लढवय्या शिलेदार श्री सुनील घाडीगावकर…

2

मालवण,ता.०१: शिरवंडे सारख्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन राजकारणात उतरलेल्या सुनील घाडीगावकर यांचा गेल्या काही वर्षात प्रगतीचा आलेख उंचावलेला राहिला आहे. कोकणचे नेते नारायण राणे यांचा लढवय्या शिलेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाडीगावकर यांची राजकीय कारकीर्द तेजोमय अशीच राहिली आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

१९९० मध्ये नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिरवंडे गावचे शाखाप्रमुख म्हणून सुनील घाडीगावकर यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. गावच्या विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राणेंनी त्यांच्या गळ्यात पंचायत समिती सभापती पदाची माळ घातली. तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने घाडीगावकर यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना राणेंचा विश्वास सार्थकी लावला. खरोखरच मालवण तालुक्याला अभिमान वाटावा असे हे लढवय्या नेतृत्व यापुढेही राजकीय क्षेत्रात उंच उंच भरारी घेईलच अशी आशा बाळगायला हरकत नाही.
१९९० मध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुनील घाडीगावकर यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. तत्कालीन तालुकाप्रमुख दत्ता सामंत यांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन घाडीगावकर यांना सातत्याने लाभली. वेळोवेळी मिळालेल्या संधीचे सोने करत घाडीगावकर यांनी आपली वेगळी छाप पाडण्यात यश मिळविले. आपल्या भागाचा विकास हेच ध्येय ठेवत घाडीगावकर यांनी आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. घाडीगावकर यांच्यात असलेली विकासाची तळमळ, अभ्यासूपणा व आक्रमकता पाहता त्यांना पंचायत समिती सदस्य म्हणून नेतृत्व करण्याची संधी नारायण राणे यांनी दिली. त्या संधीचे सोने करत गावचे सरपंच, पुन्हा पंचायत समिती सदस्य, सभापती, त्यानंतर पत्नी सोनाली जिल्हा परिषद सदस्या, आता २०१७ पासून स्वतः पंचायत समिती सदस्य व सभागृह गटनेते ही जबाबदारी घाडीगावकर यशस्वीपणे सांभाळत आहेत. सभागृहातील त्यांची आक्रमकता, सर्वपक्षीय सदस्यांना सोबत घेत विकासकामे मार्गी लावण्याची कसब, जनतेचे प्रश्न सातत्याने मांडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, विकासाच्या बाबतीत तालुका कुठेतरी मागे पडतो आहे का असे दिसत असल्यास तो कसा उभारी घेईल यासाठी त्यांचे सुरू असणारे प्रयत्न, तालुक्यातील अपेक्षित विकासकामांना स्थान नसल्यास सत्ताधारी आमदारांनाच थेट अंगावर घेण्याची त्यांच्यात असलेली धमक पाहता घाडीगावकर यांच्यातील नेतृत्व कसे असायला हवे हे दिसून येते.
सर्वच निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारा मतदार संघ म्हणून हिवाळे मतदार संघाची वेगळी ओळख आहे. गेल्या काही वर्षात ही ओळख कायम ठेवण्यात घाडीगावकर यांचे त्यांचे सर्व सहकारी, कार्यकर्ते यांचे मोठे योगदान राहिले आहे. राणेंच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभा राहणारा मतदार संघ म्हणूनही या मतदार संघाकडे बघितले जाते. या यशात अनंत राऊत, बाळा लाड, आपण स्वतः व गोपी लाड यांचे सर्वाधिक योगदान राहिले असल्याचे घाडीगावकर यांनी सांगितले. गावात प्रत्येक वाडीवर मूलभूत सोई सुविधांसह अनेक शासकीय योजना, गावात राबवून सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम घाडीगावकर यांनी केले आहे. शिरवंडे व परिसरातील गावात काजू, कोकण पीक मोठ्या प्रमाणावर होते. या पिकांमध्ये वाढ करून काजू व कोकमवर प्रक्रिया करणारे उद्योग गावात सुरू झाल्यास रोजगार निर्मिती व उत्पन्न वाढीस गती मिळेल, या दृष्टीने घाडीगावकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या बरोबर दूध उत्पादनात वाढ करून दूध संकलन करून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. गावच्या सर्वांगीण विकासात नारायण राणेंचे मोठे व सर्वाधिक योगदान आहे. त्या सोबत उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने परिसरातील गावांशी थेट संबंध असणारे दत्ता सामंत गावासाठी आधारस्तंभ आहेत.
१९९० पूर्वी मनिऑर्डरवर अवलंबून असणारा हा गाव आज सुजलाम् सुफलाम् होत असताना शिरवंडे गाव एक आदर्श रोल मॉडेल बनविण्याबरोबर हिवाळे आडवली-मालडी विभाग विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर ठेवण्याचे ध्येय घाडीगावकर यांचे आहे.
शिरवंडे सह परिसरातील गावांचाही विकास व्हावा यासाठी धडपडणाऱ्या या लढवय्या शिलेदाराची भविष्यात कारकीर्द उज्जवल राहील याबाबत तिळमात्र शंका नाही. त्यांना भावी वाटचालीस ब्रेकिंग मालवणी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा..

6

4