पाडलोस-बामणवाडी येथे शेत मांगरात ठेवलेल्या खताची चोरी…

2

बांदा,ता.०३:पाडलोस-बामणवाडी येथील सुधीर गावडे यांच्या काजू बागेमध्ये असलेल्या शेत मांगरातील खत चोरीस गेल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. श्री.गावडे यांनी आजुबाजूस चौकशी केली असता खत आढळून आले नाही. परंतु मजेशीर गोष्ट म्हणजे मांगरामध्ये त्याचदरम्यान चोराची पाचशे रुपयांची नोट आढळून आल्याचे सुधीर गावडे यांनी सांगितले.

पाडलोस कुंभारपाचा येथे सुरू असलेल्या कालव्याच्या बाजूला सुधीर गावडे यांचा शेतमांगर आहे. बेकार न राहता त्यांनी लाखो रुपये खर्च करून काजू बागायत तयार केली. बागायतीला लागणारे सर्व साहित्य उभारलेल्या शेत मांगरात ठेवण्यात येते. सद्यस्थितीत काजू कलमांना खत घालण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी खत आणले होते. त्यातील युरिया व हॉटीमिल अशी दोन प्रकारच्या खतांच्या पिशव्या गायब झाल्याच्या त्यांना मंगळवारी दिसल्या. परंतु त्याच क्षणी मांगरात पाचशे रुपयांची नोटही सापडल्याने चोराची फजेती झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. चोरी झाल्यामुळे भीती निर्माण झाली आहे.
शेत मांगराच्या कुलूपाची चावी चोरास अगोदरच माहिती होती. कुलूप न तोडता चावीच्या साहाय्याने त्यांनी खत चोरी केले. त्यामुळे चोर माहीतगार असावा असा अंदाज सुधीर गावडे यांनी व्यक्त केला. उशिरा पर्यंत बांदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली नव्हती.

5

4