लवकरच सर्व सरपंचांचेही लसीकरण पूर्ण करणार…

2

नीतेश राणेंची सरपंच बैठकीत ग्‍वाही ;  विभागनिहाय विलगीकरण कक्ष स्थापन करा…

कणकवली, ता.३ : पत्रकारांप्रमाणेच लवकरच सर्व सरपंचांचेही कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार असल्‍याची ग्‍वाही आमदार नीतेश राणे यांनी आज दिली. तसेच बेड, इमारत किंवा आर्थिक अडचणींमुळे गावनिहाय विलगीकरण कक्ष स्थापना करण्यात अडचणी येत असतील तर नाटळ मतदारसंघाच्या धर्तीवर विभागनिहाय विलगीकरण कक्षाची स्थापना करावी असेही निर्देश श्री.राणे यांनी दिले.
येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय विलगीकरण कक्ष स्थापन करताना येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने आज कणकवलीत तालुक्‍यातील सरपंचांची पंचायत समिती सभागृहात बैठक झाली. यात आमदार नीतेश राणे यांनी सरपंचांच्या समस्या जाणून घेतल्‍या. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री, महेश लाड, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, अभिजीत हजारे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय पोळ , सुर्यकांत वारंग, संतोष कानडे आदी उपस्थीत होते.
कोरोनाी दुसरी लाट रोखताना गावनिहाय येणाऱ्या विविध अडचणी तालुक्‍यातील सरपंचांनी मांडल्‍या. यात गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी शासनाने १५ व्या वित्त आयोगातून २५ टक्‍के निधी खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गाव विकासाच्या मंजूर आराखड्यामध्ये या कामांचा समावेश नसल्‍याने प्रत्‍यक्ष काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. याखेरीज जर ३० बेडचे विलगीकरण कक्ष उभारला तरच निधी खर्च करता येणार असल्‍याचे निर्देश आहेत. मात्र ३० बेड साठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. हा निधी कसा उभा करायचा हा देखील प्रश्‍न असल्‍याचे सरपंचांनी स्पष्‍ट केले. विलगीकरण कक्ष स्थापन झाल्‍यानंतर रूग्‍णांची तपासणी, आवश्‍यक ती औषधे पुरविणे व इतर कामांमध्ये आरोग्‍य सेवकांची भूमिका महत्‍वाची आहे. मात्र अनेक गावांत आरोग्‍य सेवकांची पदे रिक्‍त आहेत. पुरेशी रूग्‍णवाहिका सेवा देखील नसल्‍याची बाब सरपंचानी मांडली.
सरपंचांशी चर्चा करताना आमदार नीतेश राणे यांनी आरोग्‍य सहाय्यक पदे तात्‍पुरत्‍या स्वरूपात भरण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्‍हा परिषद अध्यक्षांना दिले. तर सरपंचांना विमा कवच मिळण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्‍वाही दिली. तालुकानिहाय ११ रूग्‍णवाहिका उपलब्‍ध आहेत. त्‍याचे गावनिहाय नियोजन करा असे निर्देश त्‍यांनी तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिले. तसेच पत्रकारांप्रमाणेच सर्व सरपंच यांचेही लसीकरण लवकरच पूर्ण होईल अशी ग्‍वाही राणे यांनी दिली.

1

4