अन्यथा….कणकवलीत प्रांताधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करू…

2

कणकवली मनसेचा इशारा;कोरोनाग्रस्तांकडुन घेतलेली अधिकची रक्कम परत करण्याची मागणी…

कणकवली,ता.०३: एचआरसीटीई,सिटीस्कॅन आदी कोरोनाच्या तपासणीसाठी शासनाने आकारल्या प्रमाणे दर आकारण्यात यावे.तसेच यापूर्वी घेण्यात आलेली जादाची रक्कम संबंधित रुग्ण किंवा त्यांना ते परत करण्यात यावी,अशी मागणी मनसेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे करण्यात आली.
दरम्यान याबाबत येत्या आठवड्यात योग्य तो निर्णय न घेतल्यास कोरोनाचे नियम पाळून प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शांताराम सादये, संतोष कुडाळकर, प्रशांत उपरकर, योगेश कदम यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेत निवेदन सादर केले.
या निवेदनात ते म्हणतात, शासनाच्या नियमावलीप्रमाणे एचआरसीटी, सिटीस्कॅन व अन्य तपासणी करणार्‍या लॅबमध्ये भरमसाठ बील आकारणी करीत असून पालकमंत्र्यांनी मागील दौर्‍यात एचआरसीटी चाचणी दर हा ३ हजारपेक्षा जास्त घेऊ नये असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शासनाचा दर तसाच ठरलेला आहे. तशाप्रकारचा शासन निर्णय असतानाही कणकवली खाजगी लॅबमध्ये ५ ते ७ हजार दर आकारतात ते तातडीने कमी करण्यात यावे. यापूर्वी खाजगी लॅबमध्ये संबंधित रुग्णांना ज्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत. त्याची जादा रक्कम घेतलेली असून ती रक्कम परत करण्यास भाग पाडावे.
शासनाने सुरुवातीच्या काळापासून खाजगी रुग्णालयांना बेड चार्ज ऑक्सिजन नसलेला व असलेला, व्हेंटिलेटर बेडचे दर निश्चित करून तसा अध्यादेश काढलेला आहे. आता अ वर्ग, ब वर्ग, व क वर्ग अशाप्रकारे वर्गवारी करून आताच आरोग्य मंत्राने दर निश्चित केलेले आहेत. सदर शासन अध्यादेशाप्रमाणे दर आकारण्याकरिता रूग्णालयांना भाग पाडावे. रुग्णालयांना रुग्ण बरा होऊन घरी सोडताना त्याने उपचारासाठी पैसे भरलेल्या बिलांची पक्क्या पावत्या व फाईल त्याच दिवशी देण्याची सूचना करण्यात यावी.
आगाऊ रक्कम जमा केलेल्या पक्क्या पावत्या सुद्धा त्याचवेळी देण्यात याव्यात. खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांकडून रोखीत रक्कम मागतात. ज्यांच्याकडे रोखीत रक्कम नसेल त्यांना नेटबँकिंग, कार्ड, चेक द्वारे घेण्याचे त्यांना आदेश काढण्यात यावेत.
वरील प्रमाणे आपणाकडून तत्काळ कारवाई करण्यात यावी व आपल्या खाजगी रुग्णालय कोविड नियंत्रण समितीमार्फत मागील दाखल असलेल्या सर्व कोविड रुग्णांची बिले तपासून अतिरिक्त बिले घेतली असल्यास त्याची छाननी करून जादा पैसे घेतलेले रुग्णांना परत करण्याचे आदेश आपणाकडून व्हावेत. तसेच शासनाचे आदेश देखील आहेत असे असताना तालुका, जिल्हा भरारी पथकाकडून चौकशी करण्यास सांगावे. फक्त पत्रव्यवहार न करता जातिनिशी आपण या तीन तालुक्याचे प्रशासन प्रमुख म्हणून होणार्‍या गैरव्यवहारात स्वत: जातिनिशी लक्ष घालून हॉस्पिटलने व लॅब यांनी आकारलेली जादा रक्कम संबंधी रुग्णांना परत मिळवून देण्याची आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी, अन्यथा पुढील आठवड्यात जनतेच्या मागणीनुसार कोणत्याही दिवशी कोविडचे नियम पाळून घंटानाद आंदोलन आपल्या कार्यालयासमोर करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला.

10

4