भाऊ कदम यांच्या भेटीने कोरोना बाधितही भारावले…

2

नगरपंचायत कोविड सेंटरला भेट ; नागरपंचायतच्या कामाचे केले कौतुक…

कणकवली, ता.०४ : आपल्या दमदार अभिनयाने हास्याचे कारंजे फुलविणारे अभिनेते भाऊ कदम यांनी आज कणकवली नगरपंचायतीच्या कोविड सेंटरला भेट दिली. भाऊ कदम यांच्या या अचानक भेटीने कोविड सेंटर मधील उपचार घेणारे रुग्ण देखील भारावले. नगरपंचायत कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासह इतर नागरिकांनी ही भाऊ कदम यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान येथील सुविधांची पाहणी केल्यानंतर भाऊ कदम यांनी कणकवली नगरपंचायतच्या या कामाचे कौतुक केले.
नगरपंचायत सेंटरची पाहणी केल्यानंतर कणकवली शहरात नव्याने उभारणी होत असलेल्या १०० बेडच्या संस्थात्मक विलीनीकरण केंद्राचीही पाहणी भाऊ कदम यांनी केली. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष यांच्या दालनात येऊन कणकवली शहर तसेच तालुक्यात कोरोना संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यांच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, गटनेते संजय कामतेकर, मेघा गांगण, कविता राणे, प्रतिक्षा सावंत, महेश सावंत , किशोर राणे, सिद्धेश महाजन, बंडू गांगण, राजू गवाणकर, अण्णा कोदे आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरची पाहणी व कणकवली नगरपंचायतच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या विलगीकरण केंद्राच्या पाहणीनंतर भाऊ कदम यांनी कणकवली नगरपंचायतच्या या कामाचे कौतुक केले. नगरपंचायतीने कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी खरोखरच नियोजनबद्ध उपाययोजना केल्या आहेत. अगदी येथे दाखल झालेल्या रुग्णांना आपल्या नातेवाईकांशी देखील संपर्क साधण्यासाठी सुविधा दिली. मनोरंजनाची साधने उपलब्ध केली. नगरपंचायतची ही कोविड सेंटर अनेकांसाठी आदर्शवत अशी आहेत असे गौरवोद्गार भाऊ कदम यांनी काढले. तसेच कणकवली नगरपंचायतला अजून कोविड सेंटर जर उभारायचे असेल व माझी मदत लागली तर त्यांना मदत करण्यास मी तयार आहे, अशी ग्वाही देखील कदम यांनी याप्रसंगी दिली.

2

4