कोरोना सेवा उपक्रमातही लोकप्रतिनिधींची टक्केवारी…

2

परशुराम उपरकर ; खासगी रूग्णालयात अजूनही दरपत्रक लागू नाही…

कणकवली, ता.४ : कोरोना हद्दपारीपेक्षा सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींना कोरोना सेवा उपक्रमांत मलिदा खाण्यात, टक्केवारी घेण्यातच अधिक इंटरेस्ट आहे. कोरोना निर्मूलनासाठी त्यांच्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. केवळ दिखाऊ उद्घाटने केली जात असल्याचा आरोप मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी आज केला.
श्री.उपरकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कोरोनामुळे मृत झालेल्यांवर मोफत उपचार करायचे आहेत. तरीही रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जातात. एवढेच नव्हे तर वन अधिकार्‍यांकडून मृतदेह जाळण्यासाठी मोफत लाकडेही घेण्यात आली आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे मृतदेह जाळण्यासाठी ४५ लाख रूपये खर्च आला असून, त्याचे बिल अद्याप प्रलंबित आहे. एका साधा कार्यकर्ता ४५ लाखाचा खर्च करूनही शांत राहतो याचाच अर्थ तो नामधारी असून मृतदेह जाळण्याचा ठेका कुठल्यातरी बड्या पदाधिकार्‍यानेच घेतला असण्याची शक्यता आहे.
श्री.उपरकर म्हणाले, आज कुडाळमध्ये ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन झाले. मात्र त्यामध्येही काही लोकप्रतिनिधींची भागीदारी असण्याची दाट शक्यता आहे. एकूणच जनतेलाही आता लोकप्रतिनिधी कोरोना काळातही राजकारण करतात, टक्केवारी खातात हे कळून चुकले आहे. त्याचा राग इथला मतदार मतपेटीतून निश्‍चितपणे व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही.
श्री.उपरकर म्हणाले, पालकमंत्री निव्वळ घोषणाबाजी करत आहेत. कणकवलीसाठी शववाहिनी देण्याची घोषणा केली. मात्र ती अद्यापही आलेली नाही. तर खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका देण्यात आल्या. मात्र या रूग्णवाहिकांचे पासिंग झाले नसल्याने त्या जिल्ह्याबाहेर जाऊ शकत नाहीत. राज्य शासनाने कोरोना उपचार करणार्‍या खासगी हॉस्पिटलसाठी दर निश्‍चित केले. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसून आजही रुग्णांची लूट सुरू आहे. पीएम केअर्समधील सर्व व्हेंटिलेटर्स खराब झाले आहेत. या सर्वांवर उपाययोजना करण्याऐवजी पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी केवळ उद्घाटने करण्यातच मश्गुल आहेत.

1

4