सिंधुदुर्गातील दलित वस्त्यांमध्ये वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाकडे लक्ष द्या….

2

अजिंक्य पाताडे; जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या सभेत मागणी…

सिंधुदुर्गनगरी ता.०४: जिल्ह्यात दलीत वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सदस्य अजिंक्य पाताडे यांनी आज सभेत केली. दरम्यान याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधा, असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच या विभागाचा ऑक्टोंबर मध्ये १०० टक्के खर्च होईल असे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी शाम चव्हाण, सदस्य अजिंक्य पाताडे, मानसी जाधव, राजलक्ष्मी डीचवलकर, संजय पडते, अधिकारी आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्ण मक मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. यात जास्त करून दलीत वस्त्यांमध्ये हे रुग्ण आढळून येत असल्याचे मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांनी सांगत याकडे त्यांनी लक्ष वेधत यावर उपाययोजना करण्याची मागणी सभेत केली. तसेच या वस्त्यांमध्ये कोरोना आजारावर जनजागृती करण्याची सूचना केली. तर या कडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधून ठोस पावले उचलण्यात यावी अशा सूचना सभापती अंकुश जाधव यांनी सभेत केल्या.
समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेस व ५ टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत येणाऱ्या प्रस्तावांना आज मान्यता घेण्यात आली तसेच आणखी प्रस्ताव मागविण्याची सूचना सभापती जाधव यांनी केली. दरम्यान या विभागाचा निधी ऑक्टोंबर २०२१ पर्यंत १०० टक्के खर्च झाला पाहिजे. त्यानुसार नियोजन करा असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. अपंग कल्याण अंतर्गत काही दिव्यांगांना स्वयंचलित वाहन (मोटारसायकल) देण्यात आले आहे. याचा काहींना लाभ मिळाला आहेत तर काहींना अद्याप मिळाला नाही. त्यांचे फोन आपल्याला येत आहेत. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या दीव्यांगांना स्वयंचलित वाहनांचा त्वरित लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल त्वरित जाहीर करण्याची सूचना केली.

1

4