खनिकर्म विभागाकडून मिळालेली रुग्णवाहिका मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल…

2

हेमंत मराठेंचा पाठपुरावा; उपोषणाच्या इशाऱ्यानंतर संबंधित प्रशासनाने घेतली दखल…

सावंतवाडी ता.०४: सिंधुदुर्गात खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यासाठी मिळालेल्या सहा रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका अखेर आज मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली,अशी माहिती मळेवाड-कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी दिली.दरम्यान संबंधित रुग्णवाहिका ४ जून पर्यंत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा श्री.मराठे यांनी प्रशासनाला दिला होता.त्याची दखल घेऊन तात्काळ ही रुग्णवाहिका या ठिकाणी पाठविण्यात आली आहे .
खनिकर्म विभागाकडून सहा रुग्णवाहिका जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या होत्या.या रुग्णवाहिका जिल्हा मुख्यालयात येऊन सहा ते सात दिवस उलटूनही त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपूर्द करण्यात आल्या नव्हत्या.यातील एक रुग्णवाहिका मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आली होती.मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेली रुग्णवाहिका आरोग्य केंद्राकडे सुपूर्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने श्री. मराठे यांनी चार जून पर्यंत नवी आलेली रुग्णवाहिका आरोग्य केंद्राकडे सुपूर्त करा,अन्यथा पाच जून रोजी मुख्यालयात उभे असलेल्या रुग्णवाहिकेच्या टपावर बसून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.या उपोषणाचा इशाऱ्या नंतर जिल्हा प्रशासन कडून आज मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेली ॲम्बुलन्स संध्याकाळी केंद्राला सुपूर्द करण्यात आली.त्यामुळे ग्रामस्थ व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.नव्याने आलेल्या ॲम्बुलन्स बद्दल मराठे यांना विचारले असता ॲम्बुलन्सची या केंद्राला नितांत गरज होती. ती नव्याने आलेल्या ॲम्बुलन्समुळे पूर्ण झाली आहे.याबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांचे आभार मानतो ,असे मराठे यांनी सांगितले.

1

4