सर्दी, ताप रुग्णांची माहिती तातडीने द्या…

2

कणकवली टास्क फोर्स बैठकीत खासगी डॉक्टरांना निर्देश…

कणकवली, ता.५ : तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय टास्क फोर्सने ठोस पावले उचलली आहेत. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व खाजगी डॉक्टर्सनी त्यांच्याकडील सर्दी, ताप, खोकला याच्या रुग्णांची दररोज माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व डॉक्टर्सनी याला सहकार्य करण्याचे आवाहन सौ. राजमाने यांनी केले आहे.
दरम्यान तालुक्यातील सध्या हॉटस्पॉट असलेल्या २५ गावांमध्ये आरोग्य विभागाची पथके रॅपिड सोबतच rt-pcr टेस्ट करण्याच्या दृष्टीने ही नियोजन करण्यात येत आहे. येथील तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स झालेल्या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितिन कटेकर, तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार, प्रशांत बुचडे व इतर उपस्थित होते.
काही ठिकाणी खाजगी डॉक्टर्स सर्दी, ताप, खोकला याच्या रुग्णांवर उपचार करतात. मात्र याबाबत तालुका आरोग्य विभागाला कळविण्यात येत नसल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा सर्व डॉक्टर्सनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना त्याच त्या दिवशी कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तालुक्यात आरोग्य विभागाने रॅपिड टेस्ट ची संख्या वाढवत चांगल्या प्रकारे काम केले. सद्यस्थितीत तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.६३ एवढा आहे तर मृत्यू दरही ३ च्या खाली आला आहे. तालुक्याचा रिकवरी रेट ८६ टक्के असून तालुक्यात झालेल्या कामाबद्दल यावेळी अभिनंदनही करण्यात आले.तालुक्यात गावनिहाय सर्वे ही चालू आहे. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएससीची कॅपॅसिटी २० करण्यात आली आहे. सीसीसीच्या कॅपॅसिटी मध्येही वाढ करण्यात आली असून ती २३५ पर्यंत आहे. ४५ गावांमध्ये ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन केले असून ते ३३० कॅपॅसिटी आहे. गावातील ग्राम विलगीकरण कक्षात पॉझिटिव आहेत पण लक्षणे नाहीत त्यांना ठेवण्यात येणार आहे. ६० वर्षावरील रुग्णांना, अपंग, गरोदर मातांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येणार आहे. सौम्य लक्षणे असलेल्याना सी सी सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. खाजगी डॉक्टरनी यादी पाठविल्यानंतर त्या रुग्णांची टेस्ट केल्याचा अहवाल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्यांनी या रुग्णांना परत तपासणीसाठी घ्यावयाचे नाही अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. तालुक्यात शालेय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत दोन गाड्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र ७ मे पासून या गाड्या कामावर नसल्याने त्यांना नोटीसही काढण्याचेया वेळी स्पष्ट करण्यात आले.आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचा वापर सद्यस्थितीत कोवीडच्या रुग्णांना अत्यावश्यक वेळी ने-आण करण्यासाठी करण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून कोवीड पेशंटला इमर्जन्सीच्या वेळी ने-आण करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यात कोरोणाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना तातडीने अमलात आणण्याच्या सूचनाही प्रांताधिकार्‍यांनी यावेळी दिल्या.

4

4