महिलांनी पर्यावरणपुरक मासिक पाळीचा कप स्विकारावा ; मनिषा घेवारी…

2

ओरोस,ता.०६: स्त्रियांकडून मासिक पाळी साठी वापरण्यात येणारा पॅड सातशे ते आठशे वर्ष नष्ट होऊ शकत नाही.त्यामुळे महिलांनी पर्याय म्हणून पर्यावरण पूरक कपचा स्वीकार करावा,असा सल्ला सांगली येथील शिक्षिका मनीषा घेवारी यांनी आज येथे ऑनलाईन बचत गटाच्या बैठकीत दिला.
महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन बचत गटांच्या महिलांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. घेवारी यांनी मासिक पाळी, तिच्या बाबत महिलांची होणारी घुसमट, आरोग्याचे प्रश्न त्याचबरोबर उद्भवणारे पर्यावरणाचे प्रश्न याबाबत सविस्तर माहिती दिली. सुरुवातीला मासिक पाळीसाठी जुन्या पुरान्या कपड्यांचा वापर होत असे. नंतर आकर्षक वेष्टनात कंपन्यांनी पॅड आणले. याच्या वापरानंतर खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा प्रश्न दिसू लागला. या पॅडवर सुमारे ८०० ते ८५० वर्ष प्रक्रिया होत नसल्याने पर्यावरणाची हानी होण्याची दाट शक्यता आहे. याला पर्याय म्हणून दहा वर्ष पुन्हा पुन्हा स्वच्छ करुन, निर्जंतुकीकरण करून वापरता येणारा मासिक पाळीचा पर्यावरणपूरक कप समोर येत आहे. २४ डिसेंबर १८८४ पासून पेटेंटेड आहे. खर्च कमी, पर्यावरणपूरक आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असा पर्याय महिलांनी स्वीकारावा असे सांगून त्याच्या वापराबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.माविमचे क्षेत्रीय समन्वयक खेमराज सावंत यांनी स्वागत करून आभार मानले.जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनीही त्यांचे स्वागत करून माविम विषयी माहिती दिली.या ऑनलाईन व्याख्यानामध्ये लोकसंचलीत साधन केंद्र(सीएमआरसी) अध्यक्ष, व्यवस्थापक,संयोगिनी व गावपातळीवरील प्रेरक सहभागी झाले होते.

12

4