टाळेबंदीतही सावंतवाडीतील ‘त्या’ शाळेत वह्या विक्रीचा व्यवसाय…

2

जिल्हा व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार…

मालवण, ता. ०६ : टाळेबंदीतही सावंतवाडी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सर्व नियम तोडून मागील दाराने वह्या विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. तरी संबंधित शाळेमधील वह्यांची विक्री तत्काळ बंद करावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व स्टेशनरीची दुकाने उघडण्यास मुभा द्यावी अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोना टाळेबंदीच्या अंतर्गत जिल्ह्यातील अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची सोडून अन्य सर्व दुकाने बंद आहेत. विविध बाजारपेठात प्रशासन व पोलिस ही बंदी मोडणाऱ्या विक्रेत्यांवर प्रसंगी दंडात्मक कारवाईही करत आहेत. गेल्याच आठवड्यात अशी बंदी मोडल्याने सावंतवाडीतील एका ब्युटी पार्लरवर तर गुन्हा दाखल करून १५ जून पर्यंत प्रतिबंधाची कारवाई केली गेली आहे तर मालवणात एका सौभाग्यलेणी विक्रेत्या महिलेला २०० रुपयांचा दंड ठोठावण्याची कर्तबगारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इमानेइतबारे बजावली आहे. आता अशाच प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश झुगारून सावंतवाडी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेने वह्या विक्री सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत विद्यार्थ्यांना, पालकांना संबंधित प्रशालेने पाठविलेला संदेश पुरावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.
शाळेतील विद्यार्थ्याचा पालक असलेल्या व वह्या पुस्तकाच्या एका विक्रेत्याने याबाबत महासंघाकडे केलेली तक्रारही केली आहे. या तक्रारीत संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे राज्यात तसेच परराज्यात बाजारपेठा बंद आहेत. सर्व ठिकाणी शाळा बंद असताना सावंतवाडीत व्यवसाय जोरात सुरू आहे. स्टेशनरी दुकानांचा माल दीड महिना येत नाही मग शाळांना माल मिळतो कसा ? दुकानासमोर पाच माणसे उभी असली तर दहा हजार रुपये दंड आकारला जातो. आता या शाळेत हजारो पालक येतील यांना दंड कोण ठोठावणार? कोण विचारणार ? व्यापाऱ्यांना कुणी वाली आहे का ? व्यापाऱ्यांना फोन येतात दहावीची, बारावीची पुस्तके आली का? क्लासेस ऑनलाईन सुरू झाले आहेत. काही शाळांनी पण सुरू केले आहेत. त्यांना परवानगी कोणी व केव्हा दिली ?शाळांमध्ये पुस्तके मिळत नाहीत वह्या मात्र दामदुपटीने विकल्या जात आहेत. परिणामी व्यापारी मोडकळीस आला आहे अशी तक्रार केली आहे. ही तक्रारही जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची तत्काळ दखल घेत प्रशालेत सुरू असलेला वह्या विक्रीचा बंद करावा अन्यथा जिल्ह्यातील सर्व स्टेशनरीची दुकाने उघडण्यास मुभा द्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

41

4