पंधरा दिवसात कोरोना हद्दपारचा संकल्प करूया…

2

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर ; जागो मालवणवासियो जागो…

मालवण, ता. ०७ : मालवणवरचे कोरोना संकट पुढील पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये नाहीसे करुन सर्व जगजीवन सुरळीत करण्याचा संकल्प करूया. जी एकजुट मालवणवासियांनी तोक्ते वादळाच्या वेळी प्रशासनाला मदत करुन दाखवली तशी एकजुट आता दाखविणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
शासनाने ब्रेक द चेन च्या अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सोबत अजून काही आस्थापना निर्बंधासह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कामकाजाचा कालावधीही वाढवला आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबत आर्थिक घड़ी लवकरात लवकर सुरु होण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. कोरोना खबरदारी नियम मोडणाऱ्यांवर प्रसंगी कारवाई सुरू आहे. शहराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास स्पीकरद्वारे मास्क वापर, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर या त्रिसूत्रीबाबत कायम जनजागृती केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी करण्यासाठी पथक नेमले आहे. संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. फिरत्या विक्रेत्यांची बाजारपेठेत जावून कोरोना स्वॅब तपासणी केली जात आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांना चपराक बसावी म्हणून त्यांची पण स्वॅब तपासणी केली जात आहे. असे असताना काहीजण अजुनही नियम पाळत नसल्याने प्रशासनाला कारवाई करावी लागत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे.
मागील दोन महिन्याच्या कालावधीत कोरोनाचे नियम न पाळल्याने सुमारे ७५ हजार रुपये एवढा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत सुमारे ७ लाख ८० हजार एवढा दंड वसूल झाला आहे. ही बाब मालवण नगरपरिषद अथवा मालवणवासीयांसाठी भूषणावह नाही. व्यापाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे नियोजित वेळ संपायच्या अगोदर १५ मिनिट नगरपरिषदचा भोंगा वाजवून लोकाना अलर्ट केल जात आहे. तरीसुद्धा पालिकेच्या कारवाई पथकाला दरदिवशी नियम मोडणारे दिसून येत असून कारवाई करणे भाग पडत आहे.
मागच्या वर्षी कोरोनाच्या सुरवातीच्या काळात ज्या प्रमाणे मालवणच्या जनतेने सहकार्य करुन जवळपास २०० दिवस मालवणला कोरोना मुक्त ठेवले होते. मात्र सद्यस्थितीत मालवणमध्ये जवळपास ६०० च्या वर पॉझिटिव्ह रुग्ण असताना आणि खरी गरज असताना पूर्वीसारखी खबरदारी व नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताना दिसत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागत आहे. होम आयसोलेशन मधील व्यक्ति बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही जण लक्षणे लपवत आहेत.
मालवणमध्ये मागच्या ४० दिवसामध्ये सुमारे ४० लोकांचे निधन झाले. त्यातील बरेच लोकांचे निधन हे वेळेत उपचार न घेतल्याने झाले आहे. त्यामुळे आता निर्णायक संगठित प्रयत्न करण्यासाठी जनतेने विचार करण्याची गरज आहे. शासन आपली कारवाई करेलच पण आता नियम तोडणाऱ्या जनतेला, व्यापारी वर्गाला प्रसंगी जनतेनेही जाब विचारण्याची गरज आहे. नियम तोडणाऱ्या व्यक्तीची, आपल्या आजुबाजुला आजारी असणारे आणि आजार लपवून ठेवणाऱ्या व्यक्तींची माहीत प्रशासनाला देणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने सोबतच मालवणची सर्व बाजारपेठ कशी सुरु होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज कोण चुकलं, का चुकलं, चुकलं की नाही चुकलं याची टीकाटिप्पणी करण्यापेक्षा सर्वानी एकत्र येवून येत्या पंधरा दिवसांत कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करूया. कोविड़ सेंटर वाढविण्याऐवजी रुग्ण संख्या कमी करुन कोविड़ सेंटर कशी कमी करता येईल ते पाहुया. अन्यथा सध्या रुग्ण वाढीचा विचार करता मागे निवेदन केल्याप्रमाणे पुढील अनलॉकच्या धोरणामध्ये ज्या शहराची रुग्णसंख्या जास्त त्याचे निर्बंध कडक करण्याचा शासन निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

5

4