पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन…

2

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

मालवण, ता. ०७ : भरमसाठ पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडर दरात वाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटून जगणे असह्य होऊन जनता हवालदिल करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील पेट्रोल पंपासमोर निषेध व्यक्त करण्यात आला.
भरमसाठ पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीचा फटका जीवनावश्यक वस्तूंच्या वाढीवर झाला आहे. रोजंदारी कामगारांसह जनतेला उपासमारीला तोंड द्यावे लागत असून त्यांचे नाकीनऊ झाले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातील असलेल्या दराच्या तुलनेत तीप्पट दरवाढ करून ब्रिटिश राजवटीलाही लाजवेल अशा या महागाईच्या खाईत सर्वसामान्य जनतेला भारतीय जनता पक्षाच्या मोदी शासनात जगणेही मुश्किल झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी संपूर्ण महाराष्ट्रात या विषयी जनजागृती करण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना केलेल्या सूचनेनुसार आज जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या आदेशानुसार तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील पेट्रोल पंपसमोर आंदोलन छेडत निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते राम धनावडे, तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, उपाध्यक्ष हेमंत माळकर, महेंद्र मांजरेकर, संदेश कोयंडे, शहराध्यक्ष जेम्स फर्नांडिस, अरविंद मोंडकर, बाबा फर्नांडिस, बाबा मेंडीस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कंबरतोड महागाई करणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय हाय अशा अनेक गगनभेदी घोषणा देवून शासनाच्या आदेशाचे पालन करत निषेध करण्यात आला.

4

4